Breaking News

शवविच्छेदनास प्रथम नकार, नंतर तयारी त्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणीगंगापूर / प्रतिनिधी ः
तालुक्यातील शिंगी येथील मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यास गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने प्रथम नकार दिला. परंतु वैद्यकीय अधीक्षक बुशरा खान यांनी या प्रकारात लक्ष घातल्यानंतर याच रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 
लैलाबी यासीन शेख या रविवारी विहीरीत पडल्या. त्यांना दुपारी नातेवाईकांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी केली. परंतु एका डॉक्टरांनी हे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. आपल्याकडे सुविधा व तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे घाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी  दिला.
या प्रकरणाची माहिती मिळताच गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक बुशरा खान यांनी दवाखान्यात धाव घेत स्वतः लक्ष घालून तेेथेच शवविच्छेदन केले. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याच्या कारणावरून शवविच्छेदन करण्यासाठी नकार देणार्‍या या डॉक्टरवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ बुशरा खान यांच्याकडे नागरिकांनी दिले.
 निवेदनावर स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिरसाट, सुनील आरण, संदीप तिखे, अकिल शेख, आलम शेख, हारून शेख, हाकीम पठाण,  इसा अमीनखाँ, युनूस शेख, रफिक पठाण, जावेद शेख यांच्या सह्या आहेत.