Breaking News

राष्ट्रीयकृत बँकांची मुजोरी वाढतेय! 'लंच ब्रेक'वरून ग्राहकांचा घोर अपमान! स्टेट बँकेच्या कुकाणे शाखेत बँक ग्राहकांनी विचारला जाब


balasaheb shete / mo. 7028351747 
ग्रामीण भागांत राष्ट्रीयकृत बँकां विशेषतः स्टेट बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारभाराविषयी कमालीचा संताप व्यक्त होतो आहे. एक तर या बँकांमध्ये व्यवस्थापक हे महाराष्ट्रबाहेरचे असतात. त्यामुळे या लोकांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील शेतकरी, कष्टकरी जनतेविषयी कुठलाही प्रेम, जिव्हाळा आणि आदर नसतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी अर्थात 'लंच ब्रेक'च्या वेळेला या बँकांची अधिकारी मंडळी ग्राहकांना अक्षरशः चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून बँकेतून हाकलून  लावत बाहेत काढतात आणि बिनधास्तपणे बँकेच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावतात. नेवासे तालुक्यातील स्टेट बँकेच्या कुकाणे शाखेत दोन दिवसांपूर्वी हा  प्रकार घडला. संदर्भात काही जागरूक बँक ग्राहकांनी बँक व्यवस्थापनाला खडसावत या प्रकारचा जाब विचारलाय.
नेहमीच्या या प्रकाराला कंटाळून या बँक व्यवस्थापनाच्या मनमानीविरुद्ध पोलीस यंत्रणेकडे यासंदर्भात तक्रार करण्याच्या निर्णयप्रत काही ग्राहक आले आहेत. या प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मिडियात नुकताच 'व्हायरल' झाला आहे.
ग्रामीण भागात शेतकरी, कष्टकरी, छोटे मोठे दुकानदार, पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींचा राष्ट्रयीकृत बँकांवर मोठा विश्वास असतो. आयुष्यभर कमविलेल्या कष्टाची भाकर अर्थात कष्टाचा पैसा ते या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठ्या विश्वासाने ठेवतात. कोणत्याही बँकेचा ग्राहक किंवा सभासद हा त्या बँकेसाठी देवासमान असतो. कारण ग्राहक आला तरच बँक चालते. मात्र या ग्राहकाला त्याचे हक्काचे पैसे काढण्यासाठी अपमानास्पद वागणूक मिळत असेल किंवा चोर, दरोडेखोर समजून त्याला जर बँकेच्या बाहेर हाकलून लावत आतून बँकेच्या मुख्य दरवाजाला कडी आणि कुलूप लावून घेतले जात असेल तर ग्राहकांचा यापेक्षा घोर अपमान दुसरा कोणता असू शकतो?
या ग्राहकांमुळेच किंबहुना या बँक ग्राहकांच्या पैशांवरच बँक चालते. मात्र या ग्राहकांवरच संशय घेत 'सिक्युरिटी' या गोंडस नावाखाली 'लंच ब्रेक'ला कुलूप लावून देवासमान असलेल्या ग्राहकाला बँकेबाहेर हाकलून लावले जात असेल तर रोजच होणाऱ्या या प्रकाराविरुद्ध कोणी ना कोणी याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करील, यात काय नवल? स्टेट बँकेच्या नेवासे तालुक्यातील कुकाणे शाखेच्या कार्यालयात काल दि. २४ ला दुपारी काही जागरूक ग्राहकांनी या प्रकाराविरुद्ध एकत्र येत आवाज उठविण्याचा प्रयन केला. या ग्राहकांचे म्हणणे एवढेच होते, की तुमच्या 'लंच ब्रेक'च्या वेळी बँक ग्राहकांनी बाहेर जायचे आणि तुम्ही कुलूप लावून घ्यायचे, असा काही तुमच्या बँकेचा नियम आहे का? आम्ही काय चोर किंवा दरोडेखोर आहोत का? आम्ही येतो म्हणून तुमची बँक चालते. मात्र या बँकेत ठेवण्यात आलेल्या खुर्च्या या बँकेच्या ग्राहकांसाठी असतांना तिथे बसलेल्या ग्राहकांना बाहेर हाकलून लावायचे आणि कुलूप लावून घ्यायचे, ही कोणती पद्धत आहे? या बँकेत येऊ नका, किंवा या बँकेशी कुठलेही आर्थिक व्यवहार करू नका, असे तरी आम्हला लेखी द्या, अशी मागणी या तक्रारदाराने यावेळी केली. दरम्यान, यासंदर्भात बँकेच्या व्यवस्थापक कार्यालयात काही ग्राहकांनी तेथील महिला अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित महिला अधिकाऱ्याने जी उर्मट उत्तरे दिली, ती ऐकून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकापर्यंत जाईल. या महिला अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, की आम्ही बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवण करायचे नाही का, आमच्या शाखेत सिक्युरिटी गार्ड नाही, त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. आमच्याकडे मोठी रक्कम असते, काही अनुचित प्रकार झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे जेवणाच्या वेळी बँकेला आतून कुलूप लावून घेतो. मात्र त्यावर एक ग्राहकाने असा प्रश्न उपस्थित केला, की तुमच्याकडे सिक्युरिटी गार्ड नाही, मग जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही बँक ग्राहकांना चोर समजता का, मग आम्ही तुमच्या बँकेतील खाती बंद करायची का? यावर प्रिती उदवंडीया या महिला अधिकाऱ्याने, तुमची बँक खाती बंद झाल्याने मला काय फरक पडणार, तुम्हाला दोन तीन वर्षांसाठी जेलमध्ये टाकू का, असा उर्मट प्रश्न उपस्थित करून स्वतःच्या मुजोरीचे दर्शन घडविले. दरम्यान, या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून स्टेट बॅंकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनादेखील हा व्हिडिओ पाठविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या कुकाणे शाखेच्या सदर महिला अधिकाऱ्याविरुद्ध या बँकेचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे बँक ग्राहकांचे लक्ष लागले आहे.