Breaking News

शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या रब्बीची आणेवारी कमी लावण्याची मागणी


शेवगाव/ प्रतिनिधी ः
शेवगाव तालुक्यातील रब्बी पिकांच्या 79 गावातील पीक आणेवारी 65 ते 69 पैसे महसूल प्रशासनाकडून लावण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. या गावांमधील पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी लावावी, या मागणीसाठी मंगळवारी शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शेवगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार अस्मिता मित्तल यांना आणेवारीबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,  शेवगाव तालुक्यात चालू वर्षी रब्बी पिकासाठी पोषक हवामान नव्हते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी लावणे आवश्यक आहे.
  गहू, ज्वारी, कांदा, हरभरा, रब्बी पिकांना थंडीचे हवामान पोषक असते. परंतु यावर्षी थंडी जास्त पडलीच नाही. बर्‍याच वेळा ढगाळ वातावरण हिवाळ्यात असायचे.
 त्यामुळे सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर पिकांवर किटकनाशकांची फवारणी करावी लागली. पिकावर झालेला खर्च व निघणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे.
यामुळे पीक उत्पादनात मोठी घट झाली. म्हणून रब्बी पिकाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी लावावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.
  यावी या मागणीसाठी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह शेतकर्‍यांनी शेवगाव तहसील कार्यालय येथे आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले. उत्पादनात मोठी घट झाली असतानाही महसूल प्रशासनाने 65 ते 69 पैसे आणेवारी लावल्याने शेतकर्‍यांवर अन्याय झालेला आहे, असे शेतकरी यावेळी म्हणाले. शिवराज कापरे यांच्यासह लक्ष्मण मडके, चंद्रकांत निकम, उद्धव सोनवणे, विठ्ठल पंडित, भीमसेन गिरमकर, संजय घुगे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
  शेतकर्‍यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर अस्मिता मित्तल यांनी या प्रश्‍नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले.