Breaking News

भारत-अमेरिका संबधाचे नवे पर्व!


भारत आणि अमेरिका दोन्ही बलाढय देश. अमेरिका आर्थिक संपन्न देश म्हणून ख्याती. तर दुसरीकडे गरीबीच्या दलदलीतून वर निघण्याचा प्रयत्न करणारा भारत देश. तरुणांची संख्या मोठया प्रमाणावर असलेल्या आपल्या देशात आर्थिक विकासात मोठी झेप घेण्याची ताकद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भारताचा दबदबा सातत्याने वाढत राहिला तर, जग व्यापून टाकण्याचे भारताचे स्वप्न साकार होईल. वास्तविक पाहता भारत-अमेरिका संबध जरी नव्या वळणार असले तरीदेखील यातून सर्वसामान्यांना काय मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संरक्षण क्षेत्रात भारत 3 अब्ज डॉलरचा व्यवहार अमेरिकेसोबत करणार आहे. यातून भारताला घातक शस्त्रास्त्र मिळणार असले, तरी अमेरिकेला शस्त्रास्त्र खरेदी करणारा एक देश मिळाला आहे. मात्र भारतात पायाभूत सोयीसुविधा, व्यापार, उद्योग या क्षेत्रांसाठी अमेरिकेडून भारताला मोठया सहकार्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानला अमेरिकेने जरी खडसावले असले, तरी अमेरिकेची भूमिका कायमच पाकिस्तानचे लाड करणारी आहे. त्यामुळे अमेरिकासोबत भारत संबध प्रस्थापित करत असतांना थोडीशी सावधानताही बाळगणे गरजेचे आहे. अमेरिका हा धूर्त देश आहे. अमेरिकाकडून भारताला कधीही हवे तसे सहकार्य मिळालेले नाही. याउलट भारताच्या मदतीला रशिया नेहमीच धावून आलेला आहे. याचा विसर भारताने आणि पंतप्रधान मोदी यांनी देखील पडू देऊ नये. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रॅम्प भारतात दाखल झाले आहेत.
त्यामुळे त्यांच्या या दौर्‍याला विशेष असे महत्व आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडिअमवर केलेल्या भाषणात भारताबरोबरचे संरक्षण संबंध अधिक बळकट करणार असल्याची घोषणा केली. मंगळवारी भारताबरोबर 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करण्यात येणार आहे. अमेरिका भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार होऊ शकतो असे ट्रम्प म्हणाले. भारतीय संरक्षण दलांना हेलिकॉप्टर आणि अन्य लष्करी साहित्य पुरवण्यासाठी उद्या आमचे प्रतिनिधी 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करतील. शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पृथ्वीवरील उत्तम शस्त्रास्त्रे भारताला याकरारावन्यद्वारे मिळणार आहे. भारतीय नौदलासाठी 24 बहुपयोगी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार होऊ शकतो. भारताला मागील एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची गरज होती. लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जातात. यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते हिंद महासागरात चीनचे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टर आवश्यक होते. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-चीन यांचे व्यापारयुद्ध सुरू आहे. चीन ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेला आव्हान देतो आहे, ते पाहता भविष्यात दोन्ही देशातील संघर्ष वाढू शकतो. अशावेळी चीनचा काऊंटर वेट म्हणून अमेरिकेला भारत हवा आहे. यासाठी भारताला चुचकारण्याचा प्रयत्न आहे. सध्या अमेरिका पाकिस्तानला महत्त्व देत असला तरी ते तात्कालिक आहे. अफगाणिस्तानमधील उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी पाकला चुचकारणे क्रमप्राप्त आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य गेल्यानंतर पाकिस्तानचे महत्त्व राहाणार नाही.
परंतु भारताशी संबंध हे दीर्घकालीन आहेत. भारत व अमेरिका यांची व्यापारतूट खूप मोठी आहे. ती सुमारे वीस अब्ज डॉलरची आहे. ती कशी भरून काढता येईल, शिवाय अमेरिकन वस्तूंवरील आयातशुल्क कसे कमी करता येईल, याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, भारत मोठ्या प्रमाणावर संरक्षण साधनसामग्री घेण्याचा करार करण्याची शक्यता आहे. त्यातून व्यापारतूट कमी होईल. तसेच अमेरिकेकडून तेल विकत घेण्याचा प्रयत्नही भारत करेल. या दोन गोष्टी सुरळीत झाल्यास त्याचा भारताला फायदा होईल. त्यामुळे, मोदींचा अमेरिकेचा दौरा भारताला या सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहेच; पण त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र सभेतील मोर्चेबांधणीसाठीही तो भारताला उपकारक ठरणारा आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा देखील असाच अविस्मरणीय असा राहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाऊडी मोदी’ या ऐतिहासिक कार्यक्रमाविषयी जगभरातच खूप उत्सुकता होती. हाऊडी मोदी हा साधासुधा कार्यक्रम किंवा तेथील भारतीयांशी संवाद नसून भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे. या कार्यक्रमात प्रथमच तेथे पन्नास हजारांहून अधिक लोक एकत्र आले. मोदी यांची ही तिसरी अशी सभा होती. यापूर्वी, 2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेत गेले असता त्यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअरमध्ये भाषण केले. 2017 मध्ये सिलिकॉन व्हॅलीत सभा झाले होते. तसाच डोनाल्ड ट्रॅम्प यांचा भारत दौरा अविस्मरणीय ठरणार आहे.  दहशतवादी आणि त्यांची विचारधारा संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करण्यास कटिबद्ध आहेत. त्यामुळेच पाकिस्तानच्या सीमेवर असणार्‍या दहशतवादी संघटना मोडीत काढण्यासाठी माझ्या कार्यालयाकडून पाकिस्तानसोबत चर्चा सुरु असल्याचे देखील ट्रॅम्प यांनी यावेळी सांगितले आहे. ट्रॅम्प यांनी पाकिस्तान संदर्भात असे विधान केले असले, तरी आगामी काळात अमेरिका भारताच्या बाजूने राहतो की, अमेरिकेच्या बाजूने जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.