Breaking News

कुंभार समाजाला योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बोरुडे यांचे प्रतिपादन


सोनई/ प्रतिनिधी ः
कुंभार समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजात मोडतो. त्यामुळे समाजाच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचा आणि या समाजाला शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठीच माझा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पदाचा वापर सर्वांच्या सहकार्याने करणार आहे, असे प्रतिपादन कुंभार समाजाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बोरुडे यांनी केले.
      बोरुडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते शनिशिंगणापूर येथे पदाधिकार्‍यांसोबत शनिदर्शनासाठी आले होते. त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. समाजाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनवणे यांनी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. यामुळे मला खर्‍या अर्थाने समाजकल्याणाचे काम सुरु करता आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत राहणार आहे. समाजाचे संघटन, युवक कार्यकर्ते मेळावा, वधू- वर मेळावे आदी समाजाच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही बोरुडे यांनी सांगितले. राज्याचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव राऊत, माजी जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, भरत जगदाळे, रामचंद्र खंडाळे, सुनील सोनवणे, कुंभार समाजाचे नगर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यावेळी उपस्थित होते.
     या निवडीबद्दल राज्याचे जलसंधारण शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम विभागाचे अध्यक्ष सुनील गडाख यांनी अभिनंदन केले आहे.