Breaking News

हिंदुत्वाची टिमकी वाजविणाऱ्यांच्या काळातही गोहत्या सुरूच! संगमनेर झालेय गोहत्येचे देवनार!

balasaheb shete / mo. 7028351747     
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धविकास होऊन देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात धवलक्रांती झाली. अनेकांच्या खिशात चार पैसे खुळखुळायला लागले. मात्र एकीकडे धवलक्रांतीतून बळीराजाच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला असताना दुसऱ्या बाजूला गोहत्येचं कुनियोजित षडयंत्र सुरु झाले. ज्या देशात गाईला मातेचा दर्जा दिला जातो, त्याच देशात गोहत्या आणि गोमांस विक्रीतून प्रचंड महसूल मिळू लागला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हा धंदा तेजीत आहे. पण ज्या महाराष्ट्रात, देशात भगवान राम, भगवान श्रीकृष्णांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारप्रणालीनुसार कारभार चालतो आणि मुख्य म्हणजे देशातही हिंदुत्वाची टिमकी जोरात वाजविणाऱ्या विचारांचे सरकार आहे. मात्र अशा हिंदुस्थानसह महाराष्ट्रात आजमितीलादेखील गोहत्या आणि गोमांसविक्रीचा धंदा सुरुच आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तर गोहत्येचे, गोमांस विक्रीचे जणू 'देवनार' झाले आहे.        
संगमनेर तालुक्यातील जम जम कॉलनी, मदिनानगर, भारतनगर, कोल्हेवाडी रोड, अलकानगर या भागांत गोमांसविक्रीचा धंदा रात्रंदिवस सुरु असतो. या तालुक्यात अनेक ठिकाणी गायी कापण्यासाठी कत्तलखाने आहेत. या तालुक्यासह जिल्ह्त्यातील सर्वच तालुक्यांत कत्तलखाने तेजीत आहेत. नेवासे तालुक्यातील चांद्याचा कत्तलखानादेखील प्रसिद्ध आहे. नगर शहरात तर जिल्हाधिकारी कार्यालयाला खेटूनच कत्तलखाने आहेत. झेंडीगेटच्या अनेक भागांतील छोटे मोठे व्यावसायिक या धंद्यातून मालामाल झाले आहेत. हा धंदा एका विशिष्ट समाजापुरताच मर्यादित राहता विविध समाजातील लोक या धंद्यात येत आहेत. दुर्दैवाची बाब ही आहे, की देशात आणि राज्यात हिंदुत्वाच्या विचारांना झुकते माप देणारी मंडळी सत्तेवर असतांनादेखील गोहत्या का थांबत नाहीत? एकीकडे छत्रपती शिवरायांच्या नावाने मते मागून सत्तेवर यायचे, भगवान राम आणि श्रीकृष्णांच्या आदर्शाचे पोवाडे गायचे आणि दुसरीकडे गोहत्येला मूग गिळून संमती द्यायची, असा दुटप्पीपणा करत राजकारण करणाऱ्यांनी अंतर्मुख होवून आत्मचिंतन करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवरायांनी गोहत्येला कधीच थारा दिला नाही. त्यामुळेच त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' म्हटले जायचे. भगवान श्रीकृष्णांना तर गोपाल म्हणूनच ओळखले जाते. भगवदगीतेत त्यांच्याबद्दल एका श्लोकात म्हटले आहे, 'नमो ब्रम्हण्य देवाय गोब्राह्मण हितायच जगत हिताय श्रीकृष्णाय गोविंदाचे नमो नमः'. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेऊन या देशाच्या पवित्र धरतीवर गायी सांभाळल्या, अशी महती असलेल्या आपल्या देशात अक्षरशः क्रूरपणे गोहत्या केली जात आहे. चारही पाय बांधून अनेक दिवस या गायींना उपाशी ठेवले जात आहे, गरम पाणी त्यांच्या शरीरावर ओतले जाते, जेणेकरून तिचे कातडे सहजासहजी काढता येईल. काही ठिकाणी गायींना यंत्राद्वारे कापले जाते. विशेष म्हणजे जर्सी गायी कापता गावरान, गीर, गायी, त्यांची वासरेदेखील कापली जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्णांच्या विचारावर कारभार करत असलेल्या मंडळींना गोहत्येचे पातक लागेल तेव्हा लागेल. मात्र कत्तलखान्यात गोमातेची सुरु असलेली तडफड, तळमळ आणि जीवाची होणारी घुसमट या लोकांच्या राजवटीत कधी थांबणार आणि पुन्हा धवलक्रांतीचा विजयोन्माद सामान्यांना पहायला मिळेल, याचीच या मातृभूमीला उत्कंठा आहे.