Breaking News

योग्य आचरणाने कॅन्सर टाळता येतो डॉ. पूजा देशमुख यांचे प्रतिपादन


कोळगाव/प्रतिनिधी :
कॅन्सर टाळण्यासाठी व्यसन करणे टाळले पाहिजे. तसेच सात्वीक आहार आणि व्यायामावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्य अधिकारी डॉ. पूजा देशमुख यांनी केले.
श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई कला महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कॅन्सर दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. ढगे, उपप्राचार्य एस. आय. घेगडे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
      देशमुख म्हणाल्या, कॅन्सर हा महाभयानक आजार आहे. या आजारामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भयंकर आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कॅन्सर या आजाराचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सर हा पहिल्या टप्प्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण वाढल्यानंतर तो बरा होऊ शकत नाही. त्यामुळे हा आजार लपवून ठेवू नये. स्त्रियांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढत आहे.  हा आजार होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. हा आजार होऊ नये यासाठी कुठल्याच प्रकारचे व्यसन करू नये. कॅन्सरबाबतचे ज्ञान विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहचवले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन एन. डी. शितोळे यांनी केले. आभार प्राध्यापक डॉ. डी. एम. शेटे यांनी मानले.