Breaking News

मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून नवी ऊर्जा : घुले जि. प.च्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ


अहमदनगर / प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात काम करताना ताणतणावांना सामोर जावे लागते. शासकीय सेवेतही अधिकारी, कर्मचार्यांना नियमांच्या चौकटीत राहून अतिशय काळजीपूर्वक आपले कर्तव्य पार पाडावे लागते. अशावेळी स्वत:चे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखणे महत्त्वाचे असते. यासाठी आवडीचा छंद जोपासणे, मैदानावर मोकळ्या हवेत खेळणे, यासाठी वेळ काढायला हवा. जिल्हा परिषदेमार्फत होत असलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांतून सर्वांना एक वेगळा आनंद मिळेल असा विश्वास वाटतो. या स्पर्धेतून निर्माण होणारे खेळीमेळीचे वातावरण होऊन या स्पर्धा प्रत्येकाला नवी ऊर्जा देणाऱ्या ठरतील, असे प्रतिपादन जि. . अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने कर्मचार्यांसाठी आयोजित क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना शुक्रवारी दि. १४ वाडियापार्क क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सभापती सुनिल गडाख, काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जि. . सदस्य शरद नवले, माधवराव लामखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, परिक्षित यादव, डॉ. सुनिल तुंबारे, श्रीकांत अनारसे, संजय कदम, नितीन उबाळे, निखील ओसवाल, सुनिलकुमार राठी, क्रीडा अधिकारी कविता नावंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील म्हणाले, बदलती जीवनशैली कामाचा अतिरिक्त ताण यामुळे प्रत्येकालाच मानसिक शांती हवी असते. नियमित व्यायाम, खेळाने आरोग्य चांगले राहते. डॉक्टर मंडळीही छंद जोपासण्याचा मैदानावर फिरणे, व्यायाम करणे यासाठी वेळ काढण्याचा सल्ला देत असतात. जिल्हा परिषदेच्या या क्रीडा सांस्कृतिक स्पर्धातून कर्मचार्यांमधील सुप्त गुणांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे. प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने यात सहभागी होवून स्पर्धेचा आनंद लुटावा. प्रारंभी वासुदेव सोळंके यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.