Breaking News

पाच दिवसांचा आठवडा आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे वचन


अहमदनगर / प्रतिनिधी
राज्यशासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्याने सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ आज येथील राजपत्रित अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी घेतली. पाच दिवसांचा आठवडा केल्याने अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याचे वचन आज या अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रियदर्शिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राज्य कार्यकारिणीचे जनसंवाद संघटन सचिव, विठ्ठलराव गुंजाळ, कोषाध्यक्ष तथा कोषागार अधिकारी महेश घोडके, महासंघाच्या दुर्गा मंचच्या जिल्हाध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली आव्हाड, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तहसीलदार घोरपडे आदींसह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.