Breaking News

कन्हैयाकुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : कन्हैयाकुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वर्ष 2016 मधील एका प्रकरणात कन्हैयाकुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका भाजप नेते डॉ. नंदकिशोर गर्ग यांनी दाखल केली होती. दि. 14 जानेवारी 2019 ला दिल्ली पोलिसात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात जेएनयूच्या 10 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश मुख्य आरोपी म्हणून करण्यात आला आहे. यामध्ये कन्हैयाकुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य आणि सात काश्मिरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दंड प्रक्रिये अंतर्गत तपास संस्थांना देशद्रोह प्रकरणी आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागते. याच्या मंजुरीची फाईल दिल्ली सरकारकडे पाठवण्यात आली आहे. यावर केजरीवाल सरकारने आतापर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही. पोलिसांनी कन्हैयाकुमार आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य समवेत इतर लोकांविरोधात न्यायालयाने 14 जानेवारीला आरोपपत्र दाखल केले होते. त्यात त्यांनी 9 फेब्रुवारी 2016 ला विद्यापीठ परिसरात एका कार्यक्रमात देशाविरोधात दिलेल्या घोषणांचे समर्थन केले आणि मोर्चा काढण्यात आल्याचा उल्लेख केला होता.