Breaking News

निर्भयाच्या दोषीच मानसिक स्वास्थ बिघडले ; याचिका दाखल दोषीची शिक्षेपासून वाचण्यासाठी न्यायालयासमोर नवीन युक्ती


नवी दिल्ली ः निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 1 फेबु्रवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. फाशी देण्याच्या दृष्टीने सगळी तयारी पूर्ण करण्यात आल्यानंतर दोषींकडून विविध याचिका करून, फाशीची शिक्षा लांबत चालली आहे. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा यानं शिक्षेपासून वाचण्यासाठी न्यायालयासमोर नवीन युक्ती वापरली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. सोबतच आता त्यानं आपली मानसिक स्थिती बिघडल्याचं सांगत फाशीच्या शिक्षेपासून मुक्त करण्याची मागणी केलीय. राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात दोषी विनय शर्मा यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयानं निर्णय सुरक्षित ठेवलाय. ’विनय शर्मा याची मानसिक स्थिती योग्य नाही. मानसिकदृष्ट्या छळ झाल्याने विनय मेंटल ट्रॉमाशी झगडत आहे. यामुळे त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही’ असे विनय शर्मा याचे वकील ए पी सिंह यांनी न्यायालयात म्हटलंय. तुरुंग प्रशासनानं विनयला अनेकदा मानसिक रुग्णालयात दाखल केलंय. त्याला वेगवेगळी औषधं देण्यात आली. एखाद्याला तेव्हाच मानसिक रुग्णालयात दाखल केलं जातं जेव्हा त्याची मानसिक स्थिती योग्य नसेल, असा दावाही सिंह यांनी कोर्टासमोर केला. राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आलेल्या दया याचिकेवर प्रश्‍नचिन्ह लावताना ’मी अन्यायाला रोखू इच्छितो, अधिकृत फाईलवर गृहमंत्री आणि एलजी यांची स्वाक्षरी नाही, यासाठी मला फाईलचे निरीक्षण करायचंय. यासाठी मी आरटीआय अर्जदेखील दाखल केला’ असेही सिंह यांनी कोर्टासमोर म्हटले. भारतात पहिल्यांदाच चार अशा व्यक्तींना फाशी देली जाणार आहे जे सराईत गुन्हेगार नाहीत, असा दावाही सिंह यांनी केला. सॉलिसिटर तुषार मेहता यांनी मात्र, हा खूप गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून ’रेअरेस्ट ऑफ द रेअर’ केस असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तुरुंगातील प्रत्येक कैद्याची नियमानुसार नियमितरित्या मानसिक तपासणी केली जात असल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालय आपला निर्णय देईल. मात्र दोषींच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध याचिकांमुळे, दोषींच्या फाशीची शिक्षा लांबणीवर पडत असल्याचे दिसून येत आहे. निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. 16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत 23 वर्षीय निर्भयाला धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. या अमानुष कृत्यानंतर बसमधून पीडितेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.