Breaking News

भाजपचा महाराष्ट्रातील एक खासदार होणार कमी ?

जयसिद्धेश्‍वर स्वामींचा जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात
सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्‍वर स्वामी यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे जयसिद्धेश्‍वर स्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे जात पडताळणी समितीने सांगितले आहे. जयसिद्धेश्‍वर स्वामी हे सोलापूर या राखीव मतदारसंघाचे खासदार आहेत. जातीचा दाखलाच रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी आता धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. 
प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्‍वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. 15 फेब्रुवारी रोजीच यावर सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला. खासदार जयसिद्धेश्‍वर स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचं समितीने म्हटले आहे. दरम्यान, दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्थ समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी जयसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या वकिलाने केली होती. पण जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचंही जयसिद्धेश्‍वर स्वामी यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी म्हटलं होतं. सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इतर जातीच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्‍वर स्वामी यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांची खासदारकीही जाऊ शकते. पण याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचाही अधिकार त्यांच्याकडे असेल. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्‍वर स्वामींनी बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. पण त्यांचं मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. 2014 मध्ये निवडून आलेल्या शरद बनसोडेंना तिकीट न देता यावेळी भाजपने लिंगायत समाजातील आध्यात्मिक गुरू जयसिद्धेश्‍वर स्वामींना तिकीट दिलं. तर काँग्रेसनेही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना तिकीट दिलं. शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय गृहमंत्रिपदही भूषवले आहे. सोलापूर एकेकाळी शिंदेंचा गड मानला जायचा. तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यासोबत सोलापूरहूनही निवडणुकीस उभे राहिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात चांगलाच जोर लावला होता. मोठ्या प्रमाणात प्रचारही वंचितच्या नेत्यांनी या मतदारसंघात केला होता. पण विजय भाजपनेच मिळवला. तर दुसरीकडे, सोलापुरातील जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्द खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. मूळ कागदपत्रे जोडली आहेत, त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर सादर करता आली नसल्याचं सांगत, दक्षता पथकाने नोंदवलेल्या अहवालावर आक्षेप घेत नवे पथक नियुक्त होऊन पुराव्याची पुनर पडताळणी करण्याची मागणी केली आहे. भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागणार की न्यायालयात आव्हान दिले जाणार यावरच चर्चा सुरु झाली आहे. त्यातच सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास आणि भाजपने पक्षादेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.