Breaking News

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील


मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांची निवड जाहीर केली. तर मुंबईच्या अध्यक्षपदीही मंगलप्रभात लोढा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या अध्यक्षपदी पाटील यांची पुन्हा नियुक्ती होईल असे बोलले जात होते. मुंबईचा अध्यक्ष बदलला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा लोढा यांनाच संधी दिली आहे. पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी निवडीनंतर दिली आहे. राज्यात सर्व ठिकाणी दौरे करुन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राज्यात युतीचे सरकार असताना चंद्रकांत पाटील हे महसूलमंत्री होते. त्यावेळी विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्षपदी होते. केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाची धुरा देण्यात आली. पक्षाला गतनिवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यातच शिवसेनेबरोबरील युती तुटल्यामुळे भाजपचे सत्तेवर येण्याचे स्वप्न भंगले. सध्या सत्तेत नसणार्‍या भाजपला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे मोठे आव्हान आहे. हे शिवधनुष्य पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवले आहे.