Breaking News

संतांच्या किर्तनात महिलांचा सन्मान


भारताला समतावादी विचार सरणीच्या संताच्या प्रबोधनाची व किर्तनाची परंपरा आहे. किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील विषमतेची, कुविचाराची घाण साफ करण्याचे काम आमच्या नामदेव महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांनी करून समजाला विज्ञानवाद दिला. जातीच्या उच्च निच्चतेच्या बेड्या तोडून मानवाला मानवी साखळी मध्ये गुंफण्याचे काम या संतांनी केले म्हणून हे सर्व संत आम्हाला वंदनीय आहेत. या संतांनी दिलेली शिकवण हि समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आजही मार्गदर्शक ठरत आहे. बुआबाजी, अंधश्रद्धा, व्यसन, जातीय विषमतेवर वार करणारे खर्‍या अर्थाने ते वारकरी होते. किर्तनाचा वापर त्यांनी पैसा मिळवून पोटभरण्या साठी मुळीच केला नाही. किर्तनाच्या नावाखाली पोरकट खेळ खेळणार्‍या व अंधश्रद्धा पसरवणार्‍या मनुच्या औलादीचा संबंध किर्तनाशी मुळीच जोडू नये. संत तुकाराम महाराज यांच्या पासून तर गाडगेबाबा पर्यंत आमच्या संतांनी व्यवस्थेचा समाचार घेऊन महिलांना आदराचे स्थान दिले. महिलांचा स्वाभिमान व आत्मसन्मान आमच्या संतांनी कधीच दुखवला नाही. उलट महिला म्हणून ज्या महिला स्वतः ला च कमी लेखत त्यांना पुरूषांसारखा दर्जा देऊन त्यांची सकारात्मक माणसिकता बनवण्याचे काम या संतांनी केली. आम्ही जन्म घेऊन आमचे अस्तित्व निर्माण केले ते या स्त्रि मुळे म्हणून स्वतः चा सन्मान करण्या अगोदर महिलांचा सन्मान झाला पाहिजे अशी शिकवण या संतांनी दिली. पोरकट खेळ करून शब्दा शब्दांने अंधश्रद्धा पसरवून महिलांवर सातत्याने विनोद करणारे मनुच्या पिळावलीला किर्तनकाराच्या किंवा प्रबोधनकाराच्या रांगेत पकडणे म्हणजे बौद्धिक अपंगत्व असल्याचे लक्षण होय. किर्तन म्हणजे विनोदी खेळ नव्हे तर मनोरंजनातुन प्रबोधन म्हणजे किर्तन होय. महिलांचा सन्मान म्हणजे किर्तन होय, अनिष्ट रूढी परंपरे वर वार म्हणजे किर्तन होय. स्त्री पुरुष समता म्हणजे किर्तन होय, शिक्षणाचा प्रचार प्रसार म्हणजे किर्तन होय. संत तुकाराम महाराजांपासुन ते गाडगेबाबा पर्यंत आमच्या सर्वच संतानी किर्तनात शिक्षणाचे महत्त्व सांगितले. दैववादावर अवलंबून न राहता मेहनती, उद्योगी झाले तरच आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो. नशिबात आहे ते मिळवायला दैववादी व्हावी लागते परंतु उद्योगी झाले तर हजारो लोकांचे नशीब आपणच घडवतो अशी शिकवण आमच्या संतांनी दिली.
आमच्या संतांनी महिलांचा बोलण्यातुन, वागण्यातून नेहमीच सन्मान केला. महिलांवर विनोद न करता महिलांना महिलांची जागा पुरुषांबरोबर आहे सांगितले. घरातील महिलांनी उपास तापास न करता, देवी देवांच्या आरत्यात वेळ वाया न घालण्याचा संदेश आमच्या संतानी दिला आहे. समाजातील शंभर टक्के अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून आमचे संत विद्रोही झाले.
नवसे कायास कन्या पुत्रे होती
तर का करावे लागे पती
असे सडेतोड विज्ञानवादी प्रबोधन प्रबोधन करण्याची धमक संत तुकाराम महाराज यांच्या जवळ होती. नवस केल्याने मुल होतात तर नवरा करण्याची गरजच काय असा विज्ञानवादी संदेश देणारे तुकाराम महाराज. जर कोणी ऐरा गैरा म्हणत असेल कि मी किर्तन करतो तर तुकाराम महारांजाची ही ओवी त्याने आपल्या किर्तनातुन सांगावी. तरच त्याला किर्तन म्हणता येईल.
नाचु किर्तनाच्या रंगी
ज्ञान दिप लावू जगी
वरील ओव्या नुसार आमच्या संताचे किर्तन हे ज्ञाना साठी होते. किर्तनाच्या माध्यमातून ज्ञान प्रसारित झाले पाहिजे हाच तर किर्तनाचा उद्देश असतो. पण आपल्या बोलण्यातून समाजामध्ये अज्ञान पसरवून समाजाचे माकड चाळे करून मनोरंजन करणे याला किर्तन म्हणणार्‍यांनी संताची नावे घेऊच नये. संताची नावे घेण्यासाठी संताचे विज्ञानवादी विचार स्विकारणे आवश्यक आहे. किर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाची पेरणी करून समाजाला जागृत मानसिक सक्षम बनवण्याचे काम किर्तन करते. मनुस्मृती ची विषमता वादी घाण किर्तनाच्या माध्यमातून संतांनी साफ केली म्हणून त्यांना विद्रोही म्हटल्या गेले. अनेक संकटे आली तरी आमचे संत खचून गेले नाही किर्तनाचा उद्देश बदलला नाही. आमचे तुकाराम महाराज व्यवस्थेशी तडजोड न करता व्यवस्थेवर वार करत राहिले म्हणून धर्माच्या ठेकेदारांनी तुकाराम महाराजांची वैकुंठ गमणच्या नावाखाली हत्या केली, तुकाराम महारांजांचे साहित्य इंद्रायणी मध्ये बुढवण्याचा प्रयत्न केला. कारण या संताने समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला होता. संत तुकडोजी महाराज यांनी समस्त जातीव्यवस्था उलथून टाकून मानव एकच जात आहे असे आपल्या किर्तनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला आणि समाजामध्ये जातिनिर्मुलनाची उर्जा भरली.
घरातील वाटी मोडा, हातावर भाकरी घेऊन खा पण मायबापहो लेकराला शाळा शिकवा असा संदेश गाडगेबाबा देत असत. जत्रेयाच्या ठिकाणी जाऊन लोकांची सेवा करणारे परंतू कधीच मंदिरात न जाणारे गाडगेबाबा आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करून सोडत. ही परंपरा आमच्या संताची आहे. या परंपरेच्या विरोधात जाऊन जो काम करेल तो किर्तनकार नाही तर माकड चाळे करणारा मनोविकृत असेल. संत तुकाराम महाराज यांच्या पासून तर गाडगेबाबा यांच्या पर्यंत किर्तनाच्या नावाखाली कोणीच पैसा कमावला नाही. किंवा बेरोजगार होते म्हणून ते किर्तनाकडे वळाले नाही. किर्तनामध्ये भाकर आमच्या संतानी शोधली नाही. लोकांसमोर माकडचाळे करून लाखों रुपयांनी गंडवणार्‍या व्यक्तीने स्वतः ची लाज वाटत असेल आपण किर्तनकार आहोत असे बोलूच नये. आमच्या तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांची परंपरा बंद पडणारी नाही. यांची परंपरा सुरु ठेवण्याचे काम सत्यपाल महाराज करत आहेत. सत्यपाल महाराज खर्‍या अर्थाने तुकोबायांचे वारकरी आहेत. व्यवस्थेवर वार करून सत्य समाजापुढे मांडतात, कधीच कुणाची दिशाभूल करत नाहीत. डोक्यातील अंधश्रद्धा बाजूला काढून विज्ञानवाद पेरण्याचे काम करतात. शिक्षणाचा, जातीभेद निर्मुलनाचा संदेशच देत नाही तर तसे त्यांच्या कृती मध्ये आहे.
सत्यपाल महाराज यांनी तुकाराम महाराज, नामदेव महाराज, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांची परंपरा कायम ठेवून आपल्या किर्तनात महिलांचा साडी देऊन सन्मान करतात. महिलेला आई-ताई मानुन सन्मान करणारा तोच तर खरा संत होय. किर्तनाचा आव अंगात आणून काही लोक महिलांवर विनोद करतात, हाहा हसतात असे करताना आपण सुद्धा एका महिलेच्या पोटी जन्म घेतला हे ते विसरून च जातात. संताची परंपरा कायम ठेवणारे सत्यपाल महाराज महिलांना समतावादी संविधाना सांगून सावित्रीमाईचा त्याग सांगतात. पर स्त्रिचा सन्मान करणारे छत्रपती शिवराय सांगतात. कोणत्याही भाकडकथा सांगुन पारायणात गुंतवून ठेवत नाहीत. किर्तन चालु असताना महिलांना वंदन करणारे सत्यपाल महाराज खरचं संताचे वारस आहेत. काही स्वंयघोषित किर्तनकार आपल्या आईच्या वयाची महिला पाया पडते आणि हा महाशय आईच्या वयाच्या महिलेला आशिर्वाद देतो. आणि आमचे सत्यपाल महाराज महिलांना बहीण, आई माणुन महिलांचा सन्मान करतात. हि खरी परंपरा आहे किर्तनाची.
ऐरे गैरे बेरोजगार, रोजगार शोधण्यासाठी किर्तनाच्या नावाखाली महिलांचा अवमान करून मनुस्मृती ओकत असतात. भाकडकथा सांगुन दैववादी भिती लोकांच्या डोक्यात भरून देऊन त्यांना मानसिक गुलाम बनवत आहेत . विज्ञानाचा संबंध नसल्याने अज्ञान पसरवण्याचे काम करत आहेत. छत्रपती शिवराय यांचे विचार, तुकाराम महाराज यांची एकही ओवी न सांगता कालबाह्य झालेले अंधश्रद्धेचे मटेरिअल वापरून स्वतःच्या बुद्धीचे दर्शन घडवतात. भक्त मंडळी सुद्धा ही ही ही करत लाखों रुपये देऊन आपल्याच महिलांची बदनामी ऐकण्यात धन्यता मानतात. कारण हे फक्त नावाला माणसे आहेत परंतू विचाराने अजून लहान आहेत. म्हणून मानसिक गुलाम आहेत. परंतु अशा मानसिक गुलामांना माणसात आणण्याचे काम संताचे विचार व संताचे वैचारिक वारस सत्यपाल महाराज करत असतात. कारण हे महिलांचा सन्मान करतात. समतावादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. अज्ञान, अंधश्रद्धा यांना कुठेच स्थान नाही. म्हणून आजही आमची किर्तनाची परंपरा सत्यपाल महाराज यांच्या मुळे अजूनही सुरू आहे.


विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा  9130979300