Breaking News

भाजप पक्षांतर्गतच नगरसेवकांच्या घोडेबाजाराला सुरुवात नाराज आमदार सोडणार भाजपची साथ


मुंबई : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 26 फेबु्रवारीला होणार आहे. मात्र यानिमित्त स्थनिक राजकारणांने वेग घेतला असून, भाजप पक्षांतर्गतच नगरसेवकांच्या घोडेबाजाराला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महापौर निवड प्रक्रियेतून आपल्याला वगळल्यामुळे भाजप आमदार गीता जैन यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे मिरा भााईंदर महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मोठे राजकीय नाटय रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून महापौर डिंपल मेहता यांचा महापौरपदाचा कार्यकाल येत्या 27 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत नवीन महापौरांची निवड होणे आवश्यक आहे. आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यामधील अंतर्गत वादामुळे नगरसेवकांच्या घोडेबाजीला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. आपल्या गटातील नगरसेवक फुटू नये म्हणून माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजप पक्षातील काही नगरसेवकांना दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपचे 61, शिवसेनेचे 22 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. महापौरपदाकरिता एकूण 49 नगरसेवकांचे समर्थन आवश्यक असणार आहे. या वेळी अनुसूचित जाती प्रवर्गातुन ज्योत्स्ना हसनाळे, नीला सोन्स, रुपाली शिंदे आणि दौलत गजरे महापौरपदासाठीच्या स्पर्धेत आहेत. तर विरोधी पक्षातून केवळ अनंत शिर्के एकमेव पात्र असल्यामुळे उमेदवार असणार आहेत. अशा परिस्थितीत आपले राजकीय वर्चस्व टिकून ठेवण्याकरिता माजी आमदार नरेंद्र मेहता हे नगरसेविका रुपाली शिंदे यांना महापौर बनवण्याकरिता प्रयत्न करत आहेत तर आमदार गीता जैन नगरसेविका नीला सोन्स यांच्या प्रयत्नात असल्याच्या राजकीय चर्चा सर्वत्र सुरु आहेत.