Breaking News

राहुरी शहराजवळ बिबट्याचा संचार आठवडाभरापासून वारंवार चकराराहुरी/ शहर प्रतिनिधी ः
शहरातील तनपुरे गल्ली, डुबीचा मळा, गणपती घाट परिसरात आठवडाभरापासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचार आढळत आहे. याबाबत परिसरात चर्चा झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
या भागात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांनी केली.
राज्यमंत्री प्राजक्ततनपुरे यांच्या निवासस्थान परिसरात गेल्या आठवडाभरापासून एक बिबट्याचा अधूनमधून संचार आहे. या भागात काही लोकांनी बिबट्याला पाहिले आहे. शहरातील तनपुरे गल्ली, डुबीचा मळा, मठ गल्ली, माळी गल्ली, गणपती घाट, वीटभट्टी परिसरात अधूनमधून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी गणपती घाट येथील चौधरी मळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला होता.
  शुक्रवारी (दि. 14) रोजी पहाटे चारच्या सुमारास तनपुरे गल्ली, डुबीचा मळा येथिल जावेद आतार कुटुंबियांनी घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बिबट्या फिरत असताना चित्रीत झाला आहे. या भागात बिबट्या आढळल्याने परिसरातील नागरिक विशेषतः महिला व लहान मुलांमधे घबराटीचे वातावरण पसरले आहे.
हा परिसर मुळानदी लगत असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असायचे.
 त्यामुळे बिबट्या उसात दबा धरुन बसत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा नसल्याने तो आता मानववस्तीकडे भटकू लागला आहे. वन विभागाने तत्काळ या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.