Breaking News

लोककला संवर्धनाची गरज


   महाराष्ट्र राष्ट्राला आध्यात्म, मनोरंजन व लोकधर्म टिकवणार्‍या समृद्ध अश्या लोककलांचा वारसा लाभला असून त्यास मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या माध्यमातून जपली आहे. नुकतेच अश्याच मनोरंजन करणार्‍या  नाशिक जिल्ह्यातील साकुर गावात लोककलेवर घाला घालणारी घटना घडली. यात्रा निमित्त मनोरंजनसाठी आलेल्या तमाशा कलाकरांना मारहाण करून विनयभंग करण्यापर्यंत मजल जाते.उत्सव काळात होणारे हल्ले हे कलाकारांसाठी नव्याने नाहीत. दूरचित्रवाणी व सोशल मिडियाच्या प्रभावामुळे लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या लोककलांची व कलाकारांची जपणूक करणे हा महाराष्ट्र धर्म सांगतो.          
महाराष्ट्राच्या ग्रामीण जिवनाचा मनोरंजन व प्रबोधनाचा वारसा असलेली लोककला म्हणजे तमाशा होय ग्रामीण भागात यात्रा, जत्रा, उत्सवानिमित्त या कला दीपावली नंतर ते पावसाळा चालू होत पर्यंत जेमतेम सहा महिने सादर केल्या जातात. यातून त्या कलाकारांची गावोगाव ओळख होतेच शिवाय लोकाश्रय लाभतो. नुकतीच महाराष्ट्रात गेल्या तीन पिढया ज्यांनी मनोरंजन व प्रबोधन केले असे तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोककलेचा तमाशा नाशिक जिह्यातील साकुर गावात चालू होता. कार्यक्रमाची वेळ संपल्या नंतर सुद्धा चालू ठेवण्याची आग्रही भूमिका होती यातून हा वाद उभा राहिला आणि कलाकारांना रोषाला सामोरे जावे लागले. वास्तविक ग्रामीण भागात तमाशा जरी आधुनिक करणामुळे मागे राहत असला तरी कलेची आवडहि कायम आहे. हे झालेल्या प्रकारातून दिसून येते. परंतु अश्या पद्धतीने कायदा हातात घेणे कदापी योग्य नाही.  लोकसंस्कृतीच्या कला आणि कलाकार टिकवायचे असले त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.        
लोककला या ग्रामीण जीवनाचे अंग आहे. लोकसंस्कृतीतील कलाकारांचे जीवन पहिले तर हे कलाकार सिनेमातील कलाकारांसारखे धनदांडगे नाहीत.  एशोआरामी जीवनही नशिबी नाही. अल्पभूधारक किंवा पुर्णपणे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून याच कलाकारीवर कुटुंबाचा गाडा ओढत असतात. सहा महिन्यानंतर पावसाळा व हिवाळा हा त्यांना हाताला काम नसल्याने रिकामा जातो. यातील कलाकरांना मिळणारे मानधन किंवा पगार हा बाकीचे महिने बसून खाता येतील इतका नसतो त्यामुळे प्रचंड असे शोषण होत असते. निवृत्ती नंतरचे जीवन मात्र एखादया वैराग्य सारखे जाते.वयोमर्यादा किमान 50 वर्षे पूर्ण केलेल्या कलाकारास मिळणारे मानधन हे तुटपुंजे आहे. त्यावरच आयुष्याची संध्याकाळ ढकलत न्यावी लागते. अनेक कलाकारांच्या वाट्याला भीक मागण्याची वेळ आलेली वाचण्यात येते. तीन ते चार दशके हे कलाकार निखळ मनोरंजन करतात त्यांच्या उरलेल्या आयुष्याचा वाटयाला आलेले हे विदारक सत्य आहे. शासनाने या कलाकारांसाठी अनेक सन्मानजनक योजना दिल्या व  राबवल्या पाहिजेत. परंतु केवळ शासनावर भार न ठेवता लोकसहभागातून सुद्धा गाव पातळीवर त्यांना सन्मान व पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तरच भविष्यात या कला पुढच्या पिढीला पाहवयास मिळतील.  
महाराष्ट्राला अनेक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहेत त्यातील आषाढी व कार्तिकीची वारी, आख्या महाराष्ट्रच दैवत असलेल्या पांडुरंगाच्या भेटीला ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारी हा वारकरी चालत असतो. मुखी पांडुरंगाचे नाम व ग्यानबा तुकारामाचा जयघोष करत अवघे आसमंत भक्तिमय होऊन जाते. टाळमृदंगाच्या गजराने माणसांची मने सांधली जातात. या परंपरेतून अध्यात्मिक प्रबोधन घडविणारी हि कृषिसंस्कृती ने दिलेली देणगी आहे. आध्यत्मिक प्रबोधन करणारी लोककला मध्ये किर्तन हि मोठी परंपरा आहे. संतांनी किर्तनाच्या माध्यमातून लोककल्याण घडवून आणले हे भारत भूमीचे वैशिष्ट्य आहे. या बरोबर, प्रवचन, भारूड, कोकण भागातील दशावतार हे सारे अध्यात्म संस्काराचे केंद्र आहे. लोकधर्म व लोकसंस्कृती मांडणारी लोककला गोंधळ, भराड, व कुलदैवताचे जागरण यातून त्यांनी धर्म व राष्ट्र टिकवण्यासाठी या कलांचा विकास होत गेला. पुरुषार्थ जागवणार्‍या शूरवीरांच्या गाथा सांगणार्‍या मनोरंजन लोककला म्हटली तर शाहिरी होय राजाचे व वीराचे गुणगान सांगणारी हि परंपरा आहे. यात पोवाडा तसेच भेदिक हि कला पौराणिक कथांच्या माध्यमातून सादर करून लोकसंस्कृती टिकवली. लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी जनसाक्षरतेच मोठे कार्य केलेले दिसून येते. शृंगारिक मनोरंजन म्हटलं तर या लोककलेत तमाशा हा सर्व प्रथम येतो या बरोबर लोकनाट्य सुद्धा तोलामोलाची कला आहे. तमाशा कलेतून गण,गौळण,फारसा व वगनाट्यसादर होत असते. गणरायाचे नमन, श्रीकृष्ण लिला त्या नंतर निखळ मनोरंजन म्हणून फारसा, विनोद, शृंगारिक सादरीकरणातून रसिक श्रोत्यांना मोहित केले जाते.  यात लावणी कलेने जनमानावर भुरळ घातली आहे. त्यानंतर वगनाट्य मधून पौराणिक कथा, चालू घडामोडींवर,राष्ट्रवीरांवर नाट्य उभे रून लोकाला संबोधन केले जाते यातुन खरी कलाकारांची कसरत दिसून येते. आणि पाहता पाहता रसिक श्रोत्यांचे आशिर्वाद घेऊन जातात. अश्या लोककलेच्या दूतांना अपमानास्पद वागणूक मिळावी हि लाजीवानी गोष्ट आहे.                          
छत्रपती शिवरायांच्या काळात कृषिसंस्कृतीतून उगम पावलेल्या लोककलांना मोठा मान सन्मान मिळाला. त्यानंतर अश्या कलाकारांनी आपली राष्ट्रसेवेचे व्रत अंगिकारले होते. आज या सार्‍या लोककला लुप्त होत चालल्या असून त्यांची जागा आता ऑर्केस्ट्रा, संगीतपार्टी ने घेतली. शिवाय चॅनेल वरून , सोशल मिडियावरून भरपुर मनोरंजन होत असल्याने रसिकांनी या कडे पाठ फिरवली आहे. लोकगीते व लोकसाहित्य हि आज निर्माण होताना दिसत नाही. हि शोकांतिका आहे. वासुदेव, गोंधळी, पोतराज, भुत्ये, रेणुराई, वाघ्या मुरुळी, बहुरूपी, पिंगळा, रायरन, नंदीवाले, डोंबारी, गारुडी खेळ हे सारे दृष्टी पटलाआड गेले आहे .या शिवाय भलरी, जात्यावरची गाणी, मोटेवरची गाणी, अंगाई, पाळणा गीत, या गोष्टी नवीन पिढीला माहित नाही. या बरोबर आदिवासी आधुनिक झाल्याने आदिवासी लोकगीते व नृत्य कला मागे पडल्या आहेत. या भटक्या समाजातील आजही यापैकी कोणी दारात लोकगीत गात आला तर त्याकडे दुर्लक्ष व हाकलून देण्याची भाषा करतात. कि ज्या अश्या लोककलांनी हिंदवी स्वराज्याची गुप्तपणे राखण केले त्या कलाकारांवर आज उपासमारीची वेळ येऊन पडली आहे.हि शोकांतिका आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वकल्याणासाठी मागितलेले पसायदान, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली गाथा ,संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली भारुडे, पट्ठेबापूरावांनी गायलेली लोकशाहीरी चिरंतन आहे. ती मागे हि होती, आजही आहे, पुढे असेल ! या सार्‍या भक्ती रसाचा आणि मानवी जीवनाचा अतूट असा सबंध आहे. लोकसंस्कृती टिकली तर महाराष्ट्र टिकेल अन्यथा वाताहत व्हायला वेळ लागणार नाही. सत्तेचा गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींनी कलाकारांच्या संवर्धनाकडे लक्ष घातले पाहिजे. जेंव्हा या महाराष्ट्रात लोक संस्कृतीची जपणुक व आदर होईल तेंव्हाच महाराष्ट्र मंगलमय होईल.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा !

- विठ्ठल वळसेपाटील