Breaking News

बलात्काराला सुद्धा जात आहे

भारतीय समाज व्यवस्था जातीवर आधारित आहे आणि ही जातीय विषमता अजूनही बळकट आहे याचे अनेक उदाहरणे दररोज घडतात. जातीच्या उतरंडी मध्ये प्रत्येक जात आपल्या खालच्या जातीला हीन वा कमी लेखते. जातीवाद संपला असे म्हणणे म्हणजे केवळ स्वतः च्या हाताने स्वतः पाठ थोपटण्या सारखे आहे. सामाजिक जिवन जगताना जातिला प्राधान्य दिले जातेच परंतु अन्याय अत्याचाराला सुद्धां जातिचे स्वरूप दिले जाते हि पूरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा देताना, गुन्हेगारांना शिक्षा देताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातीचा वापर केला जातो हे नाकारून जमणार नाही. हल्ली महिला बलात्कार, विनयभंग खूप वाढलेले आहेत. दररोज बलात्कार होतात, दररोज महिलांच्या हत्या होतात. प्रकरण कोणते उचलायचे आणि कोणते दाबायचे हे मात्र जात ठरवते.
एखाद्या महिलेवर तरूणीवर बलात्कार झाला तर प्रत्येक बलात्कार प्रसार माध्यमे, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष उचलून धरत नाहीत. तेथे सुद्धा जात बघितली जाते आणि मग प्रकरण उचलले जाते. बलात्कार हा बलात्कार असतो मग तो कोणत्याही जातीच्या तरूणीवर असो, हत्या ती हत्या असते मग ती कोणत्याही तरूणीची असो, परंतू येथे वेगळे आहे. सर्वात अगोदर मी हे स्पष्ट करतो कि भारतात महिलांवर होणार्‍या कोणत्याच अन्याय अत्याचाराचे मी समर्थन करत नाही. पण सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हिंगणघाट च्या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांना, अविवाहित तरूणींना भयभीत करून टाकले. मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली घटनेचा निषेधच आहे. हिंगणघाट प्रकरण तरूणीला न्याय मिळावा म्हणून अनेक हात समोर आले हि चांगली गोष्ट आहे. एकजूट दाखवून पाऊल उचलले तर अन्यायाला आळा बसु शकतो. परंतू हि एकजूट जाती साठी नसावी तर खर्‍या न्यायासाठी असावी. परंतू ही एकजूट जातीसाठी होती याची प्रचिती आली.
हिंगणघाट प्रकरण ताजे असताना दुसरी एक घटना घडली ती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील. पिडीत तरुणी हि विवाहित होती. तिन चार वर्षांपासून त्या विवाहित तरुणीला ब्लॅक मेल करून मित्र बलात्कार करत होते. जेव्हा प्रथम बलात्कार झाला तेव्हा दूसर्‍या मित्राने व्हिडीओ बनवून तरूणीला ब्लॅक मेल करून नंतर दोघांनी बलात्कार करायला सुरुवात केली. तरुणीला सदर प्रकार असह्य झाला प्रकरण कोर्टात गेले. प्रकरण कोर्टात गेल्यानंतरही नराधमांचे कारनामे थांबले नाहीत. पुन्हा त्यांनी ब्लॅक मेल करून बलात्कार केला तरूणीने नकार दिला तरी बलात्कार झालाच तेव्हा ती तरूणी गर्भवती होती. गर्भवती तरूणीवर बलात्कार होतो हि गोष्ट तरूणीला सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते. दोन पानाचे पत्र सोडून गळफास घेते.
बलात्काराला कंटाळून सोडून गेलेल्या या तरुणीचे प्रकरण हिंगणघाट सारखे उचलले जात नाही तेव्हा मात्र जातीय विषमता किती बळकट आहे याची परिचिती येते. हिंगणघाट ला बलात्कार हिंगोली ला बलात्कार, हिंगणघाटची तरूणी मयत झाली, हिंगोली ची तरुणी मयत झाली हिंगणघाट साठी हजारो हात आणि हिंगोलीसाठी कुणीच नाही असे का? बलात्कारामध्ये जात शोधने कितपत योग आहे? सदर गोष्ट पचणारी नसली तरी सत्य आहे. हिंगोलीच्या घटनेमधील आरोपी जेमतेम सातवी आठवी पास झालेले होते आणि पिडीत तरुणी पदवीधर होती. मुलीला जन्म देऊन सन्मानाने वागणूक देऊन जर तिच्यावर अन्याय अत्याचार होत असतील आणि तिला न्याय मिळत नसेल तर मुलींना संरक्षण व शिक्षण नेमके द्यायचे कुणी? आणि कशासाठी?
हिंगोलीची घटनेच्या जखमा ताज्या असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या मध्ये एका गावात विवाहित महिलेवर तिच्या सात वर्षाच्या मुलिवर बलात्कार करून विहिरीत मारून टाकले. बलात्कार करून विहिरीत फेकून देणे म्हणजे अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. अजूनही जगाची ओळखही न होणार्‍या कळीला उमलल्या आधिच तोडून टाकले. मुलीला शिक्षण देऊन मोठे करण्याचे स्वप्न बघणार्‍या आईचे स्वप्न ते स्वप्नातच ठेवून अमानुष पणे बलात्कार करून मारून टाकणे म्हणजे किती चिड आणणारा प्रकार आहे. एवढी मोठी घटना होऊन देखील सिल्लोड तालुक्यातील घटनेसाठी हात समोर आले नाही. तिनही घटनांचा विचार केला तर तिनही घटनांचा निषेधच आहे. परंतू हिंगणघाट प्रकरण उचलून धरले आणि हिंगोली व सिल्लोड प्रकरण सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, आणि विद्युत प्रसार माध्यमांनी उचलून धरले नाही याचे कारण काय असावे. तिनही ठिकाणी बलात्कार, तिनही ठिकाणी मृत्यू मग तिनही घटना एकाच पारड्यात का मोजल्या जात नाहीत. हिंगणघाटची बातमी मी विद्युत प्रसार माध्यमावर बघितले तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवले हिंगणघाटचा आरोपी हा खालच्या जातीतील आहे.
जर आरोपी खालच्या जातीतील असेल म्हणजे प्रकरण उचलले असेल तर हे न्यायीक नाही. बलात्काराचा निषेध करण्यासाठी जेव्हा महिला रस्त्यावर येतात तेव्हा महिलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे बलात्काराचा निषेध जात बघून नाही तर गुन्हा बघून करणे आवश्यक असते. हिंगोली व सिल्लोड चे आरोपी खालच्या जातीतील नसावे म्हणून हे प्रकरण दुर्लक्षित केले गेले असेल.  या प्रकरणा व्यतिरिक्त एका महिन्या अगोदरच सिल्लोड तालूक्या मध्येच  एका महिलेवर बलात्कार करून जाळून टाकले होते ते प्रकरण उचलल्या गेले नाही. नांदेड जिल्ह्यात शिक्षकांनीच विद्यार्थिनीवर बलात्कार केला ते प्रकरण उचलले नाही. चिमुकल्या वर बलात्कार होतो, महिलांवर बलात्कार होतो. आणि जात बघून आपण निषेध करतो हि लाजिरवाणी गोष्ट आहे. जात बघून एखाद्या गोष्टिचे समर्थन किंवा विरोध होत असेल तर भविष्यात त्याच जातीत गुन्हेगार जास्त निर्माण होतात. हि परिस्थिती माहिती असुनही फक्त जातीच्या लोकांना शिक्षा होऊ नये एवढाच हेतु डोळ्यासमोर ठेवून पिडीतेची बाजु घेतल्या जात असेल तर आजच लिहून ठेवा अन्याय, अत्याचार, गुन्हा कधीच कमी होणार नाही. गुन्हेजर कमी करायचे तर निपक्ष पणे गुन्हेगाराच्या विरोधात व पिडीतेच्या बाजुने उभे राहणे आवश्यक आहे. परंतु येथे आरोपींना गुन्हेगार ठरवण्या आधी त्याची जात बघून संरक्षण दिले जाते. 
अशाप्रकारे भारतात जातीला महत्त्व देऊन गुन्हेगारी सुद्धां जातीवर ठरवली जाते आणि आम्ही जात संपली असे सांगतो. दुसरी गोष्ट हिंदूत्वाचा पुरस्कार करणारे हिंदु स्त्रियांना समान का मानत नाही हा संशोधनाचा प्रश्‍न आहे. हिंदुत्व फक्त मुस्लिम लोकांचा विरोध करण्यासाठी च आहे की स्वधर्मातील स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार फक्त सरकार स्थापनेसाठी आहे सरकार स्थापन केल्यानंतर  लोकांना न्याय देण्यासाठी सुद्धां आहे? खैरलांजी येथे घडलेल्या घटनेला भोतमांगे हत्याकांड तर दिल्ली येथील घटनेला निर्भया असे का? खैरलांजी मधील पिडीतेचा फोटो नाव गाव सर्व जाहीर आणि दिल्ली प्रकरणात नाव गाव सर्व गुपित? निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा चांगली गोष्ट आहे. सर्वत्र बातम्या प्रकाशित आहे.
भोतमांगे न्याय मागता मागता मरून गेला तरी बातमी नाही? दोन्ही ठिकाणी बलात्कार, दोन्ही ठिकाणी सामुहिक अत्याचार, दिल्लीपेक्षा खैरलांजी अंगावर काटा आणणारी घटना दोन्ही घटनेचा निषेधच पण न्यायासाठी एकालाच का उचलले जाते. हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आपण एकंदर विचार केला तर आपल्याला हे मान्य करावेच लागेल जर पिडीता उच्च जातीतील असेल तर मदतीचे हात जास्त असतात, आणि पिडीता जर खालच्या जातीतील असेल तर लोक मदतीला धाऊन येत नाहीत. अजून एक सर्वात घातक गोष्ट म्हणजे ज्या जातीतील पिडीता असेल त्याच जातीतील लोकांनी रस्त्यावर उतरायचे आणि निषेध नोंदवायचा इथपर्यंत जात टिकून आहे. लग्न करताना, धर्म पाळताना जात तर मजबूत आहेच परंतू बलात्काराच्या वेळी जात बघितली जाते हे लज्जास्पद व अमानवी आहे. जात बघून बलात्काराचा निषेध करणार्‍या वा जात बघून आरोपीची पाठराखण करणार्‍या प्रवृतीचा जाहीर निषेधच.विनोद सदावर्ते
मो. 9130979300