Breaking News

पाकची आर्थिक कोंडी !

पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश. दहशतवाद्यांना पोसण्याचे काम पाकिस्तानकडून अव्याहतपणे सुरु आहे. मात्र पाकिस्तानी आजची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. महागाई गगनाला भिडली आहे. तरीदेखील तेथील सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्याऐवजी दहशतवादाला प्राधान्य देण्यात धन्यता मानण्यात येत आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा पुलवामा सारखा हल्ला घडवून आणण्याचा पाकिस्तानचा कट होता, मात्र भारतीय सुरक्षा दलाने तो उधळून लावला. भारताने बालाकोट दहशतवाद्यांचा तळावर हवाई हल्ला करून तो उद्धवस्त केला होता. मात्र पाकिस्तानने तो तळ पुन्हा सक्रिय केला आहे. सीमेजवळ तर दररोज छोटया-मोठया चकमकी घडतांना दिसून येत आहे.  पाकिस्तान कधीही सामंजस्यासाठी प्रसिद्ध नाही. विश्‍वास ठेवावा, असाही तो देश नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानची आगळीक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शस्त्रसंधी असतानाही त्याचे उल्लंघन करून गोळीबार करणे, तोफगोळे डागणे असे प्रकार महिन्यातून एक-दोन वेळा तरी घडतातच.  भारताचा युद्धात पराभव न करू शकल्याचे शल्य भारताविरोधात दहशतवादी कारवाया करून, विविध प्रकारे कुरापती काढून पाकिस्तान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या वाढत्या नापाक कारवाया वाढत चालल्या आहेत.  कुत्र्याचे शेपूट कितीही नळीत घातले, तरी नळी काढली,की ते वाकडेच होते. पाकिस्तानची गत तशीच आहे. अर्थात युद्ध केले म्हणजे त्याला धडा मिळेल, असे नाही. युद्धाने प्रश्‍न निकाली निघत नाही. तसे असते, तर तीन युद्धांत मार खाल्ल्यानंतर तरी पाकिस्तान सुधारला असता; परंतु तसे झालेले नाही. पाकिस्तानची आताची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. सामान्यांची होरपळ होत आहे. तेथील चलनाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. परकीय चलनाचा साठा संपला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्‍चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शत्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘आम्ही स्वतःहून कुठलीही तयारी करीत नाही; मात्र तुम्ही युद्धासाठी तयारी करीत असाल, तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे,’ अशा शब्दांत युद्धासंबंधीचे सूचक विधानही त्यांनी केले होते. एकीकडे ही स्थिती असताना ‘जैश-ए-मोहमंद’ ने आणखी आत्मघाती हल्ला करण्याचा इशारा आणि आता एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी दिली आहे. भारतावर दबाव ठेवण्याचा तसेच लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अर्थात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना भारतीय विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला नेण्यात आले होते, हे लक्षात ठेवावे लागेल. आता मोदी यांनी आपला लढा दहशतवाद्यांविरुद्ध आहे, काश्मिरींविरुद्ध नाही, असे स्पष्ट करून हल्लेखोरांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल, दहशतवादाला कसे चिरडायचे हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा दिला आहे. दहशतवादामुळे काश्मिरी युवकही अस्वस्थ आहेत. ते दहशतवादाविरोधातील लढाईत ते आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. त्यांना आपण सोबत घेतले पाहिजे. काश्मिरी नागरिक अमरनाथ यात्रेकरूंची काळजी घेतात. वर्षभरापूर्वी यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काश्मिरी नागरिक जखमींचे जीव वाचवण्यासाठी पुढे आले होते, अशी आठवण मोदी यांनी सांगितली. मोदी यांचा आता बदललेला काश्मीरसंबंधीचा दृष्टिकिोन स्वागतार्ह असाच आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.  भारताविरुद्धच्या सर्व आक्रमणात, सीमेवरील अतिक्रमणात आणि सर्व युद्धात आणि सर्व चच्रेमध्ये काश्मीर हेच पाकचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. 1947नंतर पाकने भारताबरोबर आणखी दोन युद्धे केली. परंतु 1965 आणि 1971मध्ये झालेल्या दोन्ही युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला. तिस-या युद्धात तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. यानंतर पाक राज्यकर्त्यांची खात्री झाली की, भारताबरोबरील युद्धात आपला निभाव लागणार नाही. त्यामुळे पाक राज्यकर्त्यांनी भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करून भारताच्या प्रगतीला खीळ घालण्याचे धोरण अवलंबले. पाकची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ने पाक व काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना हाताशी धरले व भारतात बाँबस्फोट, लष्करी ठाण्यांवर हल्ले व संसदेवरील हल्ला घडवून आणला. यासाठी पाकने भारतातील सिमी, इंडियन मुजाहिदीन यांसारख्या काही दहशतवादी संघटनांशी संधान बांधले. भारताने या हल्ल्यांबाबत आणि कारवायांबाबत पाककडे पुराव्यांनिशी तक्रार करूनही पाकने नेहमी कानावर हात ठेवले व आपली कांगावा करण्याची प्रवृत्ती कायम ठेवली. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीचा मोठया प्रमाणावर सामना करत आहे. त्यामुळे भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची गरज  आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत डबघाईला आलेली आहे. पाकिस्तानमधील आर्थिक पेचप्रसंग वाढलेले आहेत. पाकिस्तानचा जीडीपी हा बांगला देशपेक्षाही कमी झाला आहे. पाकिस्तानात बेरोजगारी,  गरीबी, उपासमारी या समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत चालल्या आहेत.  या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अक्षरशः जगभरातील देशांपुढे हात पसरतो आहे.