Breaking News

हिंगणघाट जळीतकांड: पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू मुंबई: हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं शेवटचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.
 हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.
 ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटांनी पीडितेचा रक्तदाब कमी झाला. त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे.