Breaking News

टायर्स चोरांची टोळी जेरबंद ; कोतवालीच्या 'डीबी'ची कारवाई


अहमदनगर / प्रतिनिधी
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील डीबी अर्थात डिटेक्टिव्ह ब्रँचच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी केली आहे. टायर्स चोरांची टोळी जेरबंद करत या विभागाने जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्यामार्फत तीन हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. या कामगिरीबद्दल कोतवालीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.   
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मनोज उत्तम बोठे ( वय २२, रा. पारगाव मौरा ता. जि अहमदनगर), अभिषेक अर्जुन करंजुले (वय २०, रा. पंचशील हाॅटेलमागे पाडळी रांजणगाव सुपा ता. पारनेर), बाबासाहेब रामभाऊ पुंड (वय ४० रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा. जि अहमदनगर) आदींसह अल्पवयीन तीन जणांना पकडण्यात आले आहे. केडगावमध्ये प्रितम संजय बाफना (रा. समर्थनगर लिंकरोड, केडगाव, अहमदनगर) यांचे पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात हाॅटेल अरुणोदय शेजारी अरिहंत टायर्स हे दुकान २४ तासापूर्वी फोडले होते. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकाटून दुकानातील एमआरएफ अपोलो, मिसलीन, सिएट, राल्को, टिव्हीएस,  जे. के. के. लिमलाॅग या कंपन्यांचे ५१५ टायर्स आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या ७५० रबर ट्युब असा ९ लाख ४७ हजार ३०० रुपये किंमतीचे माल अज्ञात चोराने चोरुन नेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास सुरु असताना चोरीतील टायर्स सुपा येथे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना  मिळाली. यानंतर सुपा येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या  गुन्हे शाखेने सापळा लावला. या सापळ्यात मनोज बोठे, अभिषेक करंजुले, बाबासाहेब पुंड आणि तिघा अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ६ लाख १८ हजार रुपयांचे दुचाकीचे ४४५ नवीन टायर्स, १ लाख ५७ हजार ५०० रुपये चारचाकी गाड्यांचे टायर्स, ८६ हजार ८०० रुपयांची ६२० दुचाकीच्या ट्यूब, ४५ हजार रुपयांच्या १०० चारचाकी गाड्यांच्या ट्यूब, २४ हजार ५०० रुपयांचे ४ मोबाइल, १० लाख रुपयांची पिकअप गाडी, ३ लाख रुपयांचा छोटा हत्ती, ४० हजार रुपयांची सीडी डिल्कस दुचाकी असा एकूण २२ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. नि. विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे डिबीचे पो. उपनिरिक्षक सतिष शिरसाट, पो. ना. गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, पो. काँ. पी. आर. राठोड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.