Breaking News

चेंबरचे निकृष्ट काम प्रवाशांसाठी ठरतेय घातक दुरुस्ती न केल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशाराकोळगाव/प्रतिनिधी :
 श्रीगोंदे शहरातील शनी मंदिरामधील सांडपाणी काढलेल्या ड्रेनेज पाईपचे चेंबर नगरपालिकेने चौकातील रस्त्याच्या मधोमध काढले. तदनंतर त्या ठिकाणी चेंबरचे काम केले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ते चेंबर जड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे खचले आहे. त्याचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने छोटे मोठे अपघात याठिकाणी घडत आहेत.
 शहरातील शनिचौकातील शनिमंदिरातील सांडपाणी ड्रेनेजच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले असून या पाईप लाईनचे चेंबर चौकातील रस्त्याच्यामध्येच काढण्यात आले. या चेंबरचे काम झाल्यांनतर त्यावर पाणी मारले गेले नाही व देखभालीची काळजी घेतली. त्यामुळे त्यावरुन जाणाऱ्या जड वाहनांच्या वजनामुळे चेंबर खचला आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. दुचाकीस्वाराला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो त्या चेंबरमध्ये अडकून पडल्याने त्यासह सोबत असलेल्या चिमुरडीलाही दुखापतीस सामोरे जावे लागल्याची घटना नुकतीच घडली. असे अनेक छोटे अपघात याठिकाणी झाले आहेत. त्यामुळे याची दुरुस्ती करावी, होणारे कामे उत्कृष्ट दर्जाची करावीत अन्यथा या अपघातांची जबाबदारी नगराध्यक्ष, नगरसेवक संबंधित इंजिनिअर यांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
 

नगरपालिका विकासाच्या नावाखाली अडचणी निर्माण करुन नागरिकांच्या जिवावरच उठली आहे. तरी संबंधित अधिकारी व पदाधिकारी वर्गाने तातडीने याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांना वेगळा विचार करण्यास भाग पडू नये.
- दत्ता जगताप, अध्यक्ष, दक्ष नागरिक फाउंडेशन