Breaking News

नगरसेवक सय्यद यांच्यावर खोटा गुन्हा नगराध्यक्ष, नगरसेवकांचे मत पोलिसांना निवेदन


पारनेर/ प्रतिनिधी ः
पारनेर येथे नगरसेवक मुदस्सर सय्यद यांच्यावर विनयभंग व दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
  पारनेर येथे 22 फेब्रुवारी रोजी नगरसेवक मुदस्सर सय्यद यांच्यावर दरोडा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात जागेच्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. त्यांना मारहाण करणार्‍या विरोधी गटाने त्यांच्यावर विनयभंग व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सोमवारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्याकडे दिला होता. परंतु नगराध्यक्ष नगरे यांनी तो राजीनामा फेटाळला. नगरसेवक सय्यद यांच्यावरील खोटा गुन्हा दाखल असल्याबाबत नगरसेवकांनी एकत्र येत पारनेरचे पोलिस निरीक्षक गवळी यांना निवेदन दिले. नगरसेवक  सय्यद यांच्यावरील गुन्हा खोटा आहे.
या घटनेत सय्यद यांनाच मारहाण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. हे पोलिस प्रशासनास ज्ञात असतानादेखील त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. वस्तुतः पोलिस प्रशासनाने घटनेची खातरजमा करून गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. तरी आपण या गुन्ह्याबाबत फेरविचार करून नगरसेवकाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष वर्षा नगरे, वैशाली औटी, चंद्रकांत चेडे, नंदा देशमाने, विजेता सोबले, सुरेखा भालेकर, शशिकला शेरकर,  विशाल शिंदे, नंदकुमार औटी, किसन गंधाडे, संगीता औटी, नंदकुमार देशमुख,   विजय वाघमारे यांच्या सह्या आहेत.