Breaking News

राशीन येथे आजपासून हरिनाम सप्ताह कीर्तन, प्रवचनांचे आयोजन


कर्जत/प्रतिनिधी ः
तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवी मंदिरामध्ये 26 फेबु्रवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे.
तीन मार्चपर्यंत सप्ताह होणार आहे. सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने होणार आहे. ही माहिती संत ज्ञानेश्‍वर माऊली वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या वतीने देण्यात आली.
राशीन येथील जगदंबा देवी मंदिरात ज्ञानेश्‍वर माऊली वारकरी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहामध्ये अखंड वीणावादन, पहाटे काकडा, आरती, सकाळी ज्ञानेश्‍वरी ग्रंथ वाचन, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, संध्याकाळी हरिकीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
 सप्ताहात दत्तात्रय नवले, देविदास कानगुडे, शांतीलाल जंजिरे, नवनाथ कदम, अरूण पुंडे, भुजबळ व गोपाळ शर्मा यांचे प्रवचन होणार आहे. आजिनाथ लाड, मीरा फड, सोपान पहाणे, आचार्य डॉ.गजानन काळे, ज्ञानेश्‍वर जोगदंड, पवणे शास्त्री, डॉ. सुदाम पानेगावकर यांचे कीर्तन सप्ताहात आयोजित केले आहे. काळेवाडी, वीरशैव महिला भजनी मंडळ, बारडगाव दगडी, पिंपळवाडी, ज्ञानेश्‍वर महिला भजनी मंडळ, संतसेना महिला भजनी मंडळांचा जागराचा कार्यक्रम सप्ताहादरम्यान होणार आहे.