Breaking News

अकोलेत पर्यटनातून रोजगार निर्मिती होईल माजी मंत्री पिचड यांचे प्रतिपादन


अकोले/ तालुका प्रतिनिधी ः
आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करताना या भागातील पर्यटनही वाढावे यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. पर्यटन संस्था काढून हरिश्‍चंद्र गड, कुमशेत परिसराचा विकास केल्यास या परिसरात रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन
माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले. धारेराव मंदिर परिसर यापुढेही विकास कामात मागे राहणार नाही, असाही विश्‍वास माजी मंत्री पिचड यांनी व्यक्त केला.
कुमशेत येथील धारेराव मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
आमदार वैभव पिचड, पांडुरंग कचरे, सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, मारुती मेचकर, सुरेश भांगरे, नीलेश भांगरे, गणपत भांगरे, गणपत देशमुख, रामनाथ भांगरे, रघुनाथ साबळे, पांडुरंग भांगरे, दादा लहामटे, पांडुरंग खाडे, विजय भांगरे यावेळी उपस्थित होते.
  पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांनी माजीमंत्री मधुकर पिचड व मान्यवरांचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य, गायन   सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी महिलांनी माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांचे औक्षण केले.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, कुमशेत ग्रामस्थांनी माझ्याकडे मंदिर जिर्णोध्दारासाठी निधीची मागणी केली. त्याप्रमाणे काम पूर्ण झाले. यापुढेही या भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. मंदिराच्या कामाला अनेक अडचणी आल्या. अधिकारी व ठेकेदार यांनी कमी वेळेत काम पूर्ण केले. निवडणुकीतील पराभवाने मी काही दिवस नाराज झालो. अनेक वर्षे आपल्यामध्ये वागलो, विकासकामे केली. त्याचा लाभही गावाला झाला. मंदिरातून संस्काराची बीजे रोवली जातात. परंतु तालुक्यातील विरोधक मंदिरात सभा घेऊन शिव्याशाप देतात. तुमची दिशाभूल करतात. त्यांना त्यांचे काम करू द्या. धारेराव मंदिरापासूनच पुढील निवडणूक सुरु होईल. धारेराव देवाला प्रार्थना करतो या परिसरातील विकासकामाच्या निधीला विरोधकांनी कात्री न लावता विकास कामे होऊ द्यावीत, असेही ते म्हणाले. तोलारखिंड, औद्योगिक वसाहत आणि उर्वरित प्रश्‍न सत्ताधार्‍यांनी मार्गी लावावेत. परंतु केवळ शिव्या शाप देणे हा एकमेव कार्यक्रम विरोधकांचा आहे. एक निवडणूक हरलो म्हणून काय झाले पैलवान पराभव झाला म्हणून पाठ फिरवत नाही. पुन्हा नव्या उमेदीने तो कुस्तीला तयार असतो. परंतु जनतेने भूलथापांना बळी न पडता खर्‍या सोन्याची किंमत करावी, असेही पिचड म्हणाले. सूत्रसंचालन सी.बी. भांगरे यांनी केले. आभार गंगाराम धिंदळे यांनी मानले.