Breaking News

परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त


मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाकडून परमबीर सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे शनिवारीच या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे परमबीर सिंह आजच त्यांच्याकडून पदभार स्वीकारतील. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार यावरून गेल्या दोन दिवसांपासून विविध नावे पुढे येत होती. अखेर परमबीर सिंह यांच्या नावावरच गृह विभागाने शिक्कामोर्तब केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांची या पदावर वर्णी लागू शकते, असे राज्याच्या गृह मंत्रालयातील अधिकार्‍यानी आधीच म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील तपास पथकाने सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट दिली होती. परमबीर सिंह यांच्याकडे पोलिस दलातील प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबई पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठ्या जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे या पदावर कोणता अधिकारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागते. सेवाज्येष्ठता आणि इतर निकषांच्या आधारे या पदावरील अधिकार्‍याची निवड केली जाते.