Breaking News

गरिबी हटाव नाही गरिबी छुपाव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलॅनिया ट्रंप चालू आठवड्यात भारत दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प भेटीसाठी उत्सुक आहे. अहमदाबादच्या भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तेथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून बांधण्यात येणार्‍या भिंतीवरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेने टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही मोदींवर निशाणा साधला आहे. गरिबीतून पुढे आल्याचे  सांगणार्‍या मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी,  असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मोदींनी यापूर्वीच सदर झोपडपट्टीतील लोकांना सर्व सुविधा देऊन पक्की घरे बांधून दिली असती तर ही नामुष्कीची वेळ पंतप्रधान मोदींवर आली नसती. आता सर्व जगात अहमदाबादमधील झोपडपट्टी आणि मोदी उभारत असलेली भिंत यांचीच चर्चा सुरु झाली आहे. देशातील गरीब ही जर समस्या असेल तर मोदींच्या कार्यकाळात त्याच्यावर प्रामुख्याने विचार का केला गेला नाही, असा सवाल माध्यमांत उपस्थित झाला आहे. केम छो ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन अहमदाबाद येथिल जगातील मोठ्या स्टेडीयमवर केल्याचे मोदींचे म्हणणे आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना 11 वर्षांत आपण कोणत्याही राज्यापेक्षा गुजरातमध्ये जास्त विकास केला असल्याचा दावा मोदी वारंवार प्रसिद्धी माध्यमांसमोर करत असतात. आता अहमदाबाद येथील झोपडपट्टी ट्रम्प भेटीच्या आड येऊ लागली आहे. असो. भारत महासत्तेकडे जाणार आहे आणि देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलीयन करण्याची वल्गना मोदी वारंवार करतात, मग ते अहमदाबाद येथील झोपडपट्टीचा विकास का करू शकले नाहीत आणि ट्रम्प भारतात येत असताना त्यांना झोपडपट्टी दिसू नये, यासाठी भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. देशातील गरीब जागतिक नेत्यांना दिसू नयेत यासाठी देशात जर भिंती उभारल्या तर आपण चीनच्या भिंतीचा विक्रम मोडू शकतो, असे वाटते. तोही एक जागतिक विक्रम होऊ शकतो. असो. देशातील गरीब नष्ट करायचे की त्यांची गरिबी हा प्रश्‍न स्व. इंदिरा गांधींपासून प्रलंबित राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाचा फुगा मात्र यामुळे फुटला आहे.   
डोनाल्ड ट्रम्प हे चालू आठवड्याच्या शेवटी भारताचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तिथे त्यांच्या स्वागतासाठी ’केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला परदेशातील गुजराती बांधव आणि काही प्रतिष्ठित लोक उपस्थित राहणार आहेत. उपस्थित लोकांचा समुदाय साधारणतः सव्वा लाख असणार आहे. अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद मोदींनी मोठे स्टेडीयम बांधले आहे, जगात एवढे मोठे स्टेडीयम नसल्याचा दावा खुद्द मोदींनीच केला आहे. ‘मोदी है तो विकास है’, असे म्हणणार्‍या भक्तगणांना हा अभिमानाचा आणि ऊर भरून येणारा कार्यक्रम आहे. ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. शहराची कळा घालवणार्‍या झोपड्यांसमोर भिंती उभारल्या जात आहेत. मोदी सरकारचे हे कृत्य मानवी की अमानवी अशी चर्चा सध्या विरोधकांनीच सुरु केली आहे. गुजरातच्या विकासाचा ढोल पिटणार्‍या मोदींच्या ढोलाचे कातडे फुटल्याचे दिसते. त्यांचा गुजरात मॉडेल सपशेल खोटा निघाला. सत्तेत असताना काही विकास केला असता तर अहमदाबादमधील गरिबांची ही वस्ती दिसलीच नसती. पण गरिबांसाठी काही केले नाही म्हणून मोदीना लपवाछपवी करावी लागत आहे. अहमदाबादमधील गरिबांच्या झोपड्या ट्रम्प यांना दिसू नये यासाठी मोदींनी चालवलेला खटाटोप देशाला लाजिरवाणा आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे की, अमेरिकेतही गरिबी आहे, मग भारतातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे ? विकासपुरुष असल्याचा आव आणून बकाल शहरे व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केलेला हा घृणास्पद प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.एक  राजकीय टीका म्हणून याकडे पाहण्यापेक्षा या कार्यक्रमात परदेशी पाहुणे येत असताना त्यांना गरीबच दिसू नयेत ही मोदींची प्रामाणिक तळमळ दिसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर अहमदाबादेतील झोपड्यांसमोर भिंती बांधल्या जात आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी हे पंधरा वर्षे गुजरात राज्याचे ‘बडा प्रधान’ व आता पाच वर्षे संपूर्ण देशाचे ‘बडा प्रधान’ असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपण लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी? असा बोचरा सवाल शिवसेनेने केला आहे. ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्याच्या आवेशात वावरत आहेत, असे दिसते. ते देशाचे दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प भेटीचा देशाला काय फायदा होणार हे मोदींनी स्पष्ट केले पाहिजे. परराष्ट्रातील अध्यक्ष आपल्या देशात येत असताना त्यांच्यासाठी कार्यक्रमाची तयारी करणे गैर नसले तरी देशातील झोपडी त्यांच्या दृष्टीस पडू नये, यासाठी मोदींचा चाललेला आटापिटा केवढा मोठा आहे ! या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून 100 कोटी खर्च केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प फक्त तीन तास अहमदाबादेत थांबणार आहेत, हे विशेष ! ट्रम्प हे एक अतिश्रीमंत उद्योगपती, भांडवलदार आहेत आणि त्यांच्याशी संबंध ठेवत मोदींना त्यांच्या स्वप्नातील देश उभारायचा आहे, असे दिसते. त्यासाठी किरकोळ गरीबांचा बळी दिला जात आहे. आजपर्यंत देशाच्या इतिहासात असा पंतप्रधान झालेला नाही की, ज्याने परदेशी पाहुणे देशात येत असताना गरीब दिसू नयेत यासाठी भिंती उभारण्याची कल्पकता दाखवली होती. असो. 
भारतातील लोकसभा निवडणुकीआधी अमेरिकेत ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली होती. आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आली आहे व गुजरातमध्ये त्या उपकाराची परतफेड म्हणून ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सरकारी तिजोरीतून हे सर्व बिनबोभाट सुरु आहे. गरिबी हटाव अशा घोषणा ऐकल्या आहेत, परंतु गरिबी छुपाव अभियान देश आता मोदींच्या निमित्ताने पहात असल्याचे दिसत आहे. दि.24आणि 25 फेब्रुवारी हे दोन दिवस ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी भारतात असणार आहेत. या दोन दिवसात ते दिल्ली आणि अहमदाबादचा दौरा करतील. ट्रम्प यांच्या मार्गातली एक झोपडपट्टी लपवण्यासाठी सहा ते सात फूट उंच भिंत उभारण्यात येत आहे. ही भिंत जवळपास अर्धा किमी लांब आहे. ट्रम्प भेटीत अडचण ठरलेली झोपडपट्टी अहमदाबाद एअरपोर्टहून साबरमती आश्रमाच्या मार्गावर आहे. साबरमतीला महात्मा गांधी यांचा आश्रम आहे. मोदी यांनी सुरु केलेले झोपडी छुपाव अभियान पाहून गांधी ‘हे राम’ म्हटले असतील.अशोक सुतार
मो. 8600316798