Breaking News

माजी सैनिकांची शेतजमीन हडपणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा


अहमदनगर / प्रतिनिधी
श्रीगोंदा येथील माजी सैनिक किसन नवले आणि दादा नाडे यांना उपजीविकेसाठी शासनाकडून १९७६ साली शेतजमीन कायमस्वरूपी शासनाकडून देण्यात आली होती. मात्र ही जमीन बळकवणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करून जमिनीचा ताबा मिळवून द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिकांनी आमरण उपोषण केले.
या उपोषणात किसन नवले, दादा नाडे, विजय नवले, दत्तात्रय नाडे, जयवंत नाडे, प्रवीण नाडे, राजेश नाडे, उर्मिला नाडे, शोभा नाडे, वृषाली नाडे, लिलाबाई नाडे, श्रेया नाडे, श्रीराज नाडे, निकिता नवले, जयश्री नवले आदींनी सहभाग घेतला. माजी सैनिक किसन सखाराम नवले दादा मारूती नाडे यांना सीलिंग कायद्याने १९७६ मध्ये येळपणे ता. श्रीगोंदा येथील सर्वे नंबर ६३ ६४ मधील शेत जमीन प्रत्येकी तीन हेक्टर मिळाली. सदर जमीन १९७६ १९९०  पर्यंत कसली. परंतु १९९२ मध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी जमिनीवर कब्जा केला. गेली पंचवीस वर्षे शासनाकडे दाद मागूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे नवले नाडे यांच्या नावाने जमिनीची नोंद असूनही आज भूमिहीनाचे जिने जगत आहे. शासनाने सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अन्यायग्रस्तांना शासनाने स्वखर्चाने जमीन मोजून ताबा द्यावा तसेच सदर जमिनी बळकावणाऱ्या समाजकंटकांवर दोषी महसूल कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटीसह फौजदारी कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे