Breaking News

कर्जमाफी योजनेचे फटाके वाजवून स्वागत
अहमदनगर/प्रतिनिधी
 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस सोमवारी ब्राम्हणी येथून सुरुवात झाली. जाखणगाव आणि ब्राह्मणी या दोन गावातील लाभार्थ्यांची यादी प्रथम लावण्यात आली. सोमवारी सकाळीच शेतक-यांनी यादीचे वाचन करण्यासाठी गावात गर्दी केली होती. आॅनलाईन कर्जमाफीची यादी प्रसिद्ध होताच शेतक-यांनी फटाके वाजवून एकमेंकांना पेढे भरुन कर्जमाफी योजनेचे स्वागत केले.
 पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील (नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, जखणगाव) पात्र लाभार्थींची यादी लावण्यात आली आहे. ब्राह्मणीत सकाळीच शेतक-यांनी सेतू केंद्रावर कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी गर्दी केली होती. तहसीलदार फसोद्दीन शेख, उपनिबंधक दीपक नागरगोजे, महसूल मंडळ अधिकारी चांद देशमुख, सोसायटीचे सचिव अशोक आजबे, कामगार तलाठी संजय डोके, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे आदींसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, ब्राह्मणीतील कर्जदार ११ शेतकरी स्वत: तहसीलदार शेख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे ते संवाद साधणार आहेत.