Breaking News

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हेच पोलिस दलाचे ब्रीद

जामखेड/ प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सत्याचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश असे आहे. परंतु मागील काही काळापासून पोलिस खात्यात अनेक ठिकाणी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हेच दिसून येते आहे त्याचा अर्थही वेगळा आहे, हे शाहजान शेख (तिसगाव, ता पाथर्डी) यांनी नगर पोलीस अधीक्षक कार्यालयास वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. 
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 ला झाली असून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मुंबईला पोलीस ध्वज प्रदान करण्यात झाला. ध्वजाचा रंग निळा असून सभोवती पांढर्‍या रेशमी कापडाची किनार, मध्यभागी तारा, पंचकोनी पारंपरिक चिन्ह, तार्‍याच्या मध्यावर दोन वर्तुळे, वर्तुळात हाताचा पंजा जो अभय दर्शवतो, तार्‍याच्या खाली सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य हे आहे पोलीस दलाच्या ध्वजाचे वर्णन.
याबाबत दि.19 जानेवारी 2016 रोजी सविस्तर लेखी दिले. तसेच अनेक वेळा तोंडी लेखी पाठपुरावा करत संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी भेटून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचे कसे हे दाखवून दिले.
शेवटी प्रयत्नांना यश मिळून पोलीस अधीक्षक कार्यालय अ.नगर यांनी दि.3 जानेवारी 2020 ला पत्र काढून सर्व पोलीस स्टेशन व संबंधितांना आदेश दिले. यावेळी काढलेल्या आदेशपत्रात म्हटले आहे की, पोलीस ध्वज, पोलीस वाहने, कार्यालयीन रजिस्टर, ऑफिस फलकावर, पोलीस स्टेशनच्या दर्शनीभागावर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे वाक्य वापरात दिसून येते आहे हे चुकीचे वाक्य आहे. अनेक ठिकाणी दोन ब्रीदवाक्यांमुळे विसंगती दिसून येत आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ऐवजी सदरक्षणाय खलनिग्रहणाय हेच वाक्य सर्वत्र वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा अधीक्षक कार्यालयातून निघालेल्या पत्राची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वत्र आदेश द्यावेत. याविषयी 2016 पासून प्रयत्नांमध्ये वर्तमान पत्रांचा मोठा वाटा आहे. या विषयी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार केली होती. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे हे नेहमीचेच उत्तर मिळाले होते. यापुढे महाराष्ट्र पोलीस दलाकडून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे एकच वाक्य वापरले जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.