Breaking News

विधानपरिषदेचे नेतेपद अजित पवारांकडे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे. वर्ष 2020 मध्ये विधानपरिषदेतील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. जून 2020 मध्ये राज्य
पाल नियुक्त 12 आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जातील. मागच्या पाच वर्षात विधान परिषदेतील भाजपाची सदस्य संख्या बर्यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती. सुभाष देसाई हे मवाळ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उलट अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. शिवाय, अजित पवार कामकाजाबाबत आग्रही असतात. नियमानुसार कामकाज चालावे, सदस्यांना विशेषतः नवीन सदस्यांना बोलण्याची संधी देण्याबाबत त्यांची आग्रही भूमिका असते. नागपूर येथील अधिवेशनात अजित पवार यांनी वेळोवेळी सभागृहात नियमांचे दाखले देत कामकाज चालविण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते.

तालिका सभापती
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपाचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि काँग्रेसचे सुधीर तांबे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहतील.