Breaking News

देशाचे मालक बनू पाहणार्‍या प्रवृत्तींना न्यायपालिकेची चपराक

राजाची कार्यशैली जेंव्हा बदफैली होते,घटनेला फाट्यावर मारण्याचे धाडस राजाकडून दाखविले जाते तेंव्हा जनतेला रामशास्ञी प्रभुणे यांच्यासारख्या न्याय दात्याचाच आधार वाटतो.राजालाही चुकांची जाणीव करून देण्याचे धाडस दाखविणारी न्यायव्यवस्था ज्या देशात अस्तित्वात असते त्या देशाची लोकशाही आचंद्र अबाधित राहते.हा इतिहास आहे.भारताच्या विद्यमान न्यायव्यवस्थेतही रामशास्री बाणा दाखवणारे  न्यायमुर्ती आहेत.हे औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे.घटनाकारांच्या स्वप्नातील समान न्यायाची अपेक्षा पुर्णत्वास नेण्याचे काम याच रामशास्री बाणा दाखवणार्‍या न्यायव्यवस्थेने अखंड सुरू ठेवले तर लोकशाहीचा कणा आणखी मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही.विद्यमान राजाला भानावर आणून देश आणि सरकार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.याची जाणीव करून देत राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या वतीने रामशास्री बाण्याला सल्यूट....

स्वातंञ मिळाल्यानंतर आपण बहुपक्षीय लोकशाहीचा स्वीकार केला.लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे सरकार या धारणेने लोकशाहीच्या माध्यमांतून झालेल्या निवडणूकांत बहुमत मिळविलेल्या राजकीय पक्षाला देशाचा कारभार चालविण्याची मुभा दिली.या प्रक्रीयेत करोडो जञतेचे विश्‍वस्त म्हणून लोकनियुक्त सरकारने देशाचा कारभार बघावा.एव्हढाच त्याचा अर्थ.देशाचा मालक प्रत्येक नागरीक आहे,हाच या लोकशाही पध्दतीचा अंतिम अर्थ.हे सर्वच राजकीय पक्षांनी मान्य करून लोकशाहीला मान्यता दिली.तथापी राजकीय पक्षांमध्ये असलेली ही मुळ भावना फार काळ तग धरू शकली नाही.विशेषतः सत्ता ताब्यात येताच या भावनेचा सत्ताधार्‍यांना हळूहळू विसर पडू लागला.ज्याच्या हाती सत्ता तो या देशाचा मालक आणि देशाची जनता म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बांधावरचे सालगडी अशी भावना सत्ताधार्‍यांमध्ये मुळ धरू लागली.स्वातंञ्यानंतरचे पहिले  40 वर्ष या भावनेला सत्ताधारी पक्षाने धक्कालावला नाही पण जशी जशी सत्ता राजकीय पक्षांच्या रक्तात भिनत गेली तसतसे जनतेला लोकशाहीत हीन दर्जा दिला जाऊ लागला.व्यक्ती तितक्या प्रवृत्तीं मुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विचारांशी बांधिलकी असणारे नागरीक असणे स्वाभाविक आहे. माञ एका विचारसरणीचा नागरीक दुसर्‍या विचारसरणीच्या नागरीकाला शञू म्हणून संबोधू लागला.हळूहळू ही लाट बनत गेली आणि थेट राजकीय पक्षांच्या विचारपीठावरून हे अधोरेखीत करण्यावर भर दिला जाऊ लागला.सत्ताधारी पक्ष हा  स्वतःला देशाचा मालक समजू लागल्याने सरकार म्हणून घेतलेला कुठलाही निर्णय,त्याचे परिणाम काहीही होवोत,देशासाठी घेतले हे सत्ताधारी पक्ष सांगतो म्हणून देशाने मान्य करायचे.विरोध करायचा नाही.असा अलिखीत दंडक घालण्याची प्रथा देशात रूजू लागली.आणिबाणीसारख्या निर्णयापासून या प्रथेला सुरूवात झाली.विरोध करणारा या देशाच्या सुरक्षेला धोका ठरू शकतो,आणि त्याचे हे कृत्य कायदेशीर ठरविण्यासाठी रासुका म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा यासारखे कायदेही सत्ताधार्‍यांनी राक्षसी बहुमताच्या जोरावर संमत  करून घेतले.तोपर्यंत सत्ताधार्‍यांचा न्यायव्यवस्थेत आजच्या इतका हस्तका हस्तक्षेप दिसत नव्हता.देशाच्या सुदैवाने तत्कालीन न्यायव्यस्थेने सत्ताधार्‍यांना भानावर आणले. 
गेल्या पाच सहा वर्षात परिस्थिती माञ अतिशय वेगाने बदलतांना दिसली.केंद्रात विद्यमान सरकारने  सन 2014 मध्ये सत्तेची सुञे हाती घेतल्यापासून या क्षणापर्यंत ज्या पध्दतीने देशाचा गाडा हाकला त्यावरून अस्तित्वात असलेल्या लोकशाही मुल्यांची संकल्पना विद्यमान सत्ताधार्‍यांना मान्य नाही हेच निर्देशीत होते.या सरकारच्या कार्यकाळात सरकारच्या भुमिकेला विरोध करणारा नागरीक राष्ट्रद्रोही असा नवा दंडक अस्तित्वात आला.सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर  त्यावर भाष्य करण्याचे,सरकारला जाब विचारण्याचे प्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीनेच नागरीकांना दिले आहेत.संसदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधींनी सरकारच्या भुमिकेवर संसदीय आयुधांचा वापर करून उणिवा दाखवून द्याव्यात हा लोकशाहीनेच दिलेला अधिकार आहे.हा अधिकार विद्यमान केंद्र सरकारला म्हणजे भाजपाला मान्य असल्याचे त्यांच्या कार्यशैलीतून दिसत नाही.संसदेत लोकप्रतिनिधी,संसदेबाहेर नागरीक ,जो कुणी सरकारच्या भुमिकेला लोकशाही मार्गाने विरोध करील तो राष्ट्रद्रोही आसा फतवा भाजपाने काढल्याने देशात भितीची सुप्त लाट पसरली आहे.ज्यांनी राखण करायचे तेच जर जीवावर उठले तर संरक्षण कुणाकडे मागायचे? लोकशाहीचे चारही स्तंभ या सरकारच्या प्रभावाखाली काम करीत असल्याची पाल जनतेच्या मनात चुकचुकत आहे.माञ अद्याप या देशात लोकशाहीची मुल्ये जतन करणारी व्यवस्था आहे असा आशेचा किरण दाखवणार्‍या काही घटना या दोन दिवसात घडल्या आहेत.
भाजपाच्या सत्ताकाळात न्याय मिळणे दुरापास्त झाल्याची भावना जनमानसात मुळ धरू लागली असतानाच सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयाची खंपीठेही सरकारला चुकांची जाणीव करून देऊ लागली आहेत.अलिकडच्या काळात राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोहाची व्याख्या सरकारकडून जनतेवर लादली जाऊ लागल्याने औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांनी अहमदाबादमध्ये केलेले वक्तव्य लोकशाहीतील जनाधिकार शाबूत ठेवण्याच्या न्यायपालिकेच्या भुमिकेला अधोरेखीत करते.औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी.व्ही.नलावडे आणि न्यायमुर्ती एम.जी.सेवलीकर यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्याला शांततेने कुणी विरोध करीत असेल तर त्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही असा स्पष्ट निर्णय देत माजलगाव पोलीसांनाही खाडे बोल सुनावून आंदोलनास परवानगी देण्यास फर्मावले.त्याचवेळी अहमदाबाद येथे गुजरात उच्च न्यायालयाच्या सभागृहात पी.डी.स्मृती व्याख्यानात बोलतांना हाच मुद्दा अधोरेखीत केला.मतभेदाला देशविरोधी किंवा लोकशाही विरोधी ठरविल्यामुळे लोकशाहीच्या गाभ्यावरच आघात होतो.जे सरकार चर्चात्मक संवादास बांधिल असते ते राजकीय विरोध रोखत नाही.तर त्याचे स्वागत करते.कयद्याच्या राज्याशी बांधिलकी असलेले सरकार,सरकारी यंञणा, वैधानिक आणि शांततामय निदर्शनांना आळा घालण्यासाठी नव्हे तर चर्चेसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी कशी तैनात करता येईल हे निश्‍चित करते.या ञिन्यायमुर्तींचे हे भाष्य देशात निर्माण झालेल्या विद्यमान वातावरणाच्या विशेषतः नागरिकत्व कायद्यामुळे देशपातळीवर उभ्या राहिलेल्या शाहीनबाग सदृश्य आंदोलक वसाहतींना देशद्रोही ठरविण्याच्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे. इतकेच नाही तर टेलिकॉम कंपन्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका खटल्यात सुनावणी दरम्यान देशात कायदाच राहिला नाही तर सुप्रिम कोर्टच बंद करून टाकू हा न्यायपालिकेच्या सर्वोच्च बिंदूकडून दिलेला इशारा सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.एकूणच लोकशाहीची ढासळणारी मुल्ये सावरण्यासाठी न्यायपालिकेतील रामशास्री बाणा कणखरपणे सरसावला आहे.ही बाब भारतीय नागरिकांसाठी आणि एकूणच लोकशाहीच्या संवर्धनासाठी आशेचा किरण तर आहेच.शिवाय देशाचा मालक बनू पाहणार्‍या सत्ताधार्‍यांनाही इशारा आहे. रामशास्त्री बाणा असाच ताठ कणा दाखवेल आणि नाशिकच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांनी पुरूषांना अपेक्षित असलेली समान न्यायाची व्यक्त केलेली अपेक्षाही पुर्णत्वास जाईल अशी मनिषा बाळगण्यास वाव राहील.तोपर्यंत न्यायपालिकेतील या रामशास्ञी बाण्याला तमाम भारातीयांच्या वतीने मानाचा मुजरा!