Breaking News

बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना

राहुरी/ प्रतिनिधी : “कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना ही कृषी पणन मंडळाची महत्वाकांक्षी योजना राहुरी बाजार समिती शेतकर्‍यांसाठी राबवित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक अडचण दूर करावी’’, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी केले.
ही योजना बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली असून तिचा शुभारंभ माजी सभापती अ‍ॅड.भानुदास नवले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या हस्ते वांबोरी सबयार्ड येथे करण्यात आला. यावेळी योजनेचे लाभार्थी शेतकरी महमद साहेबखान आतार यांना शेतमालाला तारण कर्जाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच नितीन बाफना, माजी उपसरपंच ऋषिकेश मोरे, मोरेवाडी सेवा संस्थेचे चेअरमन भीमराज मांगुडे, विशाल पारख, प्रशांत नवले, योगेश वेताळ, संकेत पाटील, सुभाष पागिरे, चंद्रकांत पटारे, गंगाधर गवते यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतमाल तारण कर्ज प्राधिकृत अधिकारी संदीप पावले, वखार महामंडळ साठा अधीक्षक व जिल्हा पणन अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब भिटे म्हणाले, “हंगामाप्रमाणे राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी उडीद, मुग, मका, सूर्यफुल, हरभरा, भात, करडई, राजमा, ज्वारी, बाजरी, गहू, हळद, काजू, बेदाणे, सुपारी या शेतमालावर 6 टक्के वार्षिक व्याजदराने वखार महामंडळाच्या पावतीवर तारण कर्ज शेतमालाच्या चालू बाजारभावाच्या किंवा आधारभूत किंमतीचे कमी असणार्‍या रकमेवर  75 टक्के दराने त्वरीत शेतमाल तारण कर्ज अदा केले जाते. त्यासाठी लागणारी कागदपत्रे  वखार महामंडळाची पावती, 7/12 पिकाची नोंद असलेला उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक या शेतमाल तारण कर्ज योजनेबाबत चौकशीसाठी वांबोरी उपबाजार येथे शेतमाल तारण कर्ज योजनेचे प्राधिकृत अधिकारी एस.ए.पावले यांच्याकडे कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.