Breaking News

नगरसेवक मुदस्सीर सय्यद यांना कुर्‍हाडीने मारहाण महिलेची सय्यदबाबत विनयभंगाची तक्रार


पारनेर/ प्रतिनिधी ः
पारनेर येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद जखमी झाले आहेत. एका महिलेने नगरसेवक सय्यद यांच्यावर विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.
21 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास पारनेरमधील आनंद हॉस्पिटलसमोर नगरसेवक मुदस्सीर सय्यद, बबलू दिलावर राजे, दिलावर शेख (राहणार शेख वस्ती) यांच्यावर तीन महिलांनी हल्ला केला. त्यांनी नगरसेवक सय्यद यांना कुर्‍हाड मारली. यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. हल्ला करणार्‍यांनी आपल्या खिशातील आठ हजार रुपये रक्कमही काढून घेतली. आपल्याला व आपला भाऊ मुजाहिद यालाही यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असे नगरसेवक सय्यद यांनी पारनेर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद महिलेने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, घरामध्ये स्वयंपाक करीत असताना नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद याने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यानंतर आपल्याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. तसेच आपल्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडलही ओरबाडून घेण्यात आले. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. बबलू सय्यद, रफीक व कमरूनिसा हे तेथे येवून मुदस्सीर सय्यद यास जाब विचारत असताना तेथे मुजाहिद रफीक सय्यद आला व त्याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने  बबलू यास मारहाण केली. फर्जाना रफीक सय्यद यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली, असेही  फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी. एन. फसले करत आहेत.