Breaking News

दिल्ली हिसांचारप्रकरणी केंद्राची बघ्याची भूमिका ः सोनिया गांधी काँगे्रसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन निवेदन दिले


नवी दिल्ली : दिल्लीमध्ये हिसांचार होत असतांना, केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारची भूमिका संशयास्पद असून, त्यांनी यावर उपाययोजना करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. दिल्लीत सरकारकडून राजधर्माचे पालन झालं नसल्याचा गंभीर आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. हिंसाचारादरम्यान केंद्र आणि दिल्ली सरकार मूक दर्शक बनली. हिंसा सुरू असताना सरकारकडून कुठलही पाऊल उचललं गेलं नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चारही सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी सांगितले की, ’सीडब्ल्यूसीच्या बैठकीमध्ये आम्ही दिल्लीमधील हिंसाचाराबाबत चर्चा केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता.’ त्यांनी निवेदनातील काही गोष्टी वाचल्या आणि दावा केला की, केंद्र आणि दिल्ली सरकार हिंसाचारादरम्यान मूक दर्शक बनली. प्रशासन आणि गृहमंत्र्यांनी कोणतीही पावलं न उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडून आला. काँग्रेसच्या वतीने सोपवण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, ’आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी करत आहोत की, अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कारण हिंसा रोखण्यासाठी ते असक्षम ठरले आहेत.’ तसेच निवेदनात पुढे म्हटलं आहे की, ’आम्ही तुमच्याकडे मागणी करतो की, ’नागरिकांचं जीवन, संपत्ती आणि स्वातंत्र्य अबादित ठेवण्यात यावं. आम्ही अशी आशा करतो की, तुम्ही निर्णायक पाऊल उचलाल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बोलताना सांगितलं की, ’काही दिवसांपासून जे दिल्लीमध्ये घडत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. तसेच देशासाठी लाजीरवाणी घटना आहे. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी असक्षम ठरणं म्हणजे, केंद्र सरकारचं अपयश आहे.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, ’राष्ट्रपतींना आम्ही विनंती केली आहे की, त्यांनी सरकारला राजधर्माचं पालन करण्यासाठी सांगावं. दिल्लीमधील हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे. या हिंसेमध्ये 200 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, यमुना विहार, भजनपुरा, चांद बाग, शिव विहार या ठिकाणांवर हिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ’काल संध्याकाळपासून हिंसाचाराची कोणतीही घटना समोर आलेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये दाखल केले आहेत. आतापर्यंत हिंसा पसरवणार्‍यांमध्ये ज्या आरोपींची ओळख पटली आहे अशा 106 जणांना अटक करण्यात आली आहे.