Breaking News

बलात्काराला नेमकं जबाबदार कोण?

भारतामध्ये दिवसेंदिवस बलात्कारांचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. महिलांना रस्त्यावर चालताना सुरक्षित वाटत नाही आहे. सायंकाळी घराबाहेर पडायची महिलांची हिम्मत होत नाही. फक्त बलात्कारच नाही तर एकंदरीत महिला अत्याचार वाढलेले आहेत. महिला बलात्कार/अत्याचाराची एक जखम बरी होत नाही तोच नविन जखम होते. मनाला वेदना होतात. मन हेलकाऊन जाते, मनामध्ये भिती निर्माण होते अन आरोपी विषयी चिड सुद्धा निर्माण होते. कधी द्वेषाच्या भावनेतून कधी, कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी कधी वासनेच्या भावनेने महिलांना छळले जाते, जिवाला जाळले जाते. महिला अत्याचार/ बलात्काराची बातमी नाही असा एकही पेपर दररोज तयारच होत नाही. त्यापैकी काही बातम्या उचलून धरल्या जातात तर काही बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. बलात्कार, छेडछाड दररोजच कुठे ना कुठे होते पण विशीष्ट बाबीला महत्त्व दिल्या जाते याचा अर्थ आपण गुन्हा नाही तर व्यक्ती बघून तीव्रता ठरवतो.
आणि हिच मानसिकता घातक आहे. बलात्कार झाला, अत्याचार झाला कि जी बातमी मिडीया ने उचलली त्या साठीच अनेक महिला रस्त्यावर येतात. मेणबत्ती हातात घेऊन आदरांजली वाहतात. आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी करतात. मागणी मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरणे हा संविधानीक मार्ग आहे आणि जागृत नागरिकांचे लक्षण सुद्धा आहे. परंतु विषय हा आहे की हे सगळं केल्याने गुन्हेगाराला शिक्षा होईल पण गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल का हा संशोधनाचा विषय आहे. हल्ली बलात्कार आणि अत्याचाराचा भांडवल म्हणून वापर करणे सुरु आहे. राजकीय नेत्यांना टिकेचा विषय नसला कि मग बलात्काराला समोर ठेवून आपापल्या पक्षाची जाहीरात केली जाते. सामाजिक संघटना सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भावनिक वातावरणाचा फायदा घेताना दिसत आहे. बलात्कार झाल्या नंतर निषेध करणारे अनेक आहेत. परंतु बलात्कार अत्याचार होऊच नये यासाठी उपाययोजना करणारे लोक किती आहेत? बलात्कार होतात, अत्याचार होतात पण हे का होतात याचा शोध घेणे आवश्यक असताना आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. आपण कधिच विचार करत नाही आज बलात्कार होतात तर का होतात? महिला सुरक्षित नाही तर का नाही? कोणताही आरोपी गुन्हा करायचा तर एकदम करत नाही. त्याचे नियोजन त्याच्या डोक्यात कितीतरी दिवसापासून असते.  आरोपी अगोदर आपल्या मनाला तयार करण्यासाठी मेहनत घेतो, मनाची मशागत करतो. दोन्ही बाजुंचा विचार करतो आणि मन जेव्हा परिपक्व होऊन तयार होते तेव्हा तो बलात्कार करतो. एखाद्या ठिकाणी बलात्कार झाला तर त्याची तयारी त्या आरोपीने अगोदरच केलेली असते. वेळ बघून तो गुन्हा करतो. प्रत्येक वेळी गुन्हेगाराला शिक्षा देऊनच गुन्ह्याचे प्रणाम कमी होत नाही म्हणून पर्याय शोधने आवश्यक असते. आणि यावर अनेक पर्याय आहेत. आज महिला साक्षर होऊन जागृत होत आहेत. चुकुनही महिलांच्या विरोधात एखादा शब्द निघाला तर महिला त्या विरोधात आवाज उठवत आहेत. परंतु आजही महिला मुळावर घाव करत नाहीत. म्हणून गुन्हेगाराला शिक्षा मिळत असली तरी गुन्ह्याचे प्रमाण वाढतच आहे. कोणतीही गोष्ट करायची तर त्या गोष्टींचा उगम असतो तसाच उगम आपल्या महिला बलात्कार व अत्याचाराचे शोधणे आवश्यक आहे. टिव्हिवर साबणाची जाहिरात दाखवताना अर्धनग्न महिला आणि तेही मादक स्वरूपात दाखवली जाते, सुगंधकाची जाहिरात सुद्धा अर्धनग्न व मादत भुमिकेत दाखवली जाते. एका पेणाची जाहिरात सुद्धा दाखवण्यासाठी अर्धनग्न महिला दाखवली जाते. थोडक्यात वारंवार अर्धनग्न महिला व मादक दृश्य दाखवल्यामुळे बरोचशे लोक जाहिरात न बघता त्या जाहिराती मधील मादकता घेतात व आपले विचार त्यावर आधारित बनवत असतात. त्यामुळे महिला आकर्षण जास्त होते. आज आपण बघतो कपड्याची जाहिरात करताना महिलांच्या अंगावर कपडे नसतात, वाहिण्या वरील मालिका, सिनेमा बघितला तर प्रत्येक ठिकाणी बलात्कार अत्याचार दाखवले जातात. यामुळे माणसाची माणसिकता हि स्त्रि विषयी कामुक बनवली जाते.  जाहिरात कंपनी विरोधात अजूनही एकही महिला गेली नाही. अनेक जाहिरातीमधुन महिलांना दुय्यम लेखून फक्त उपभोगाचं साधन आहे असा संदेश देऊन सुद्धा या विरोधात अजूनही कोणी गेले नाही. एक साध गणित आहे. दररोज जर  कोणतीही वाहीनी बघितर किमान दोन बलात्कार, पाच विनयभंग बघायला मिळतो महिन्याचा विचार केला तर साठ बलात्कार दिडशे विनयभंग वर्षाचा विचार केला तर 720 बलात्कार आणि अठराशे पेक्षा जास्त विनयभंग बघतो. एवढे जर तो एका वर्षात बघत असेल तर दहा पंधरा वर्षात किती बघेल आणि एवढे बलात्कार एवढे विनयभंग केल्यास त्याच्या डोक्यात कोणते विचार येतील? साहजिकच आहे जे बघितलं ते जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. घटना घडल्या नंतर मुलांना दोष देऊन मुलींना संरक्षणाचे धडे देण्याच्या गोष्टी करणारे लोक बलात्काराचा विचारच मुलाच्या डोक्यात येणार नाही या साठी काम करताना दिसत नाहीत. खरं बघितलं तर सोशल मिडिया च्या माध्यमातून अश्‍लील ता वाढलेली आहे. घराचा लाड म्हणा की कामाचा व्याप म्हणा किंवा टिव्हि सिरिअल बघण्यात मग्न म्हणा कारण कोणतेही असु शकते पण याचा परिणाम मुलांच्या संस्कारावर झालेला दिसतोय. म्हणून बलात्कारा सारख्या घटना घडतात. आपण मुलींना संरक्षणाचे धडे देण्यासोबतच जर मूलांवर सुद्धा संस्कार घालण्याचे ठरवले तर गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. मानसशास्त्रानुसार कोणतीही एक गोष्ट सतत सात वेळा ऐकली तर मानवाचा मेंदु ती स्विकरत असतो. त्याचा प्रभाव मानवावर होत असतो. आता सात दिवस आपण चांगले ऐकले तर चांगले विचार स्विकारणार आणि वाईट ऐकले तर वाईट विचार स्विकारणार. जर सात दिवसात एवढा फरक जाणवतो तर मग सततच अश्‍लील ता, बलात्कार बघणार्‍या डोक्यात संस्कार येतीलच कसे? काही लोकांच्या व महिलांच्या मते स्त्रियांचा पेहराव, कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असल्याने असे प्रकार घडतात. पण महिला हि मुळत: सुंदर व आकर्षित असते ते नैसर्गिक आहे. थोडकेच कपडे घातल्याने पुरूषांच्या कामवासनेच्या नजरा महिलांवर पडतात देखील. शॉर्ट कपडे वापरले तर पुरुष महिलांकडे केसांपासून नखा पर्यंत निरखून बघतात. पण ते बघून एकदम छेडछाड किंवा बलात्कार होत नाहीत. पण नेहमीच शॉर्ट कपडे घालण्यार्‍या महिला पाहून जर त्याने डोक्यात फिट केले तरच तो हिम्मत करतो पण हि हिम्मत एका दिवसाची किंवा त्या क्षणाची नसतेच. म्हणून महिलांच्या कपड्यामुळे बलात्कार होतात हे म्हणणे चुकीचे आहे. आणि आपले शरीर झाकल्या जाणार नाही एवढे कपडे वापरणे सुद्धा चुकिचे आहे. आज मेणबत्त्या हातात घेऊन मोर्चे काढल्या पेक्षा संस्काराचे धडे मुलांना दिले तर गुन्ह्यांचे प्रणाम कमी होईल. आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवून त्याचे वर्तन तपासणे आवश्यक आहे. शाळा कॉलेज मध्ये संस्कार घालणे महत्त्वाचे आहेत. टिव्हि व सोशल मीडिया चा वापर कमी करून किंवा टिव्हि आणि मिडीया वरील अश्‍लीलता बाजूला सारली तर बलात्कारांची पेरणी डोक्यात होणार नाही आणि डोक्यात पेरणी झाली नाही तर समाजात गुन्हेगार तयार होणार नाहीत. समाजील मुलांवर संस्कार घालण्याची जबाबदारी फक्त एकाची नसुन सर्वांची आहे. महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, संताची भुमी आहे आणि या भुमी मध्ये असे होणे अपेक्षित तच नाही. म्हणून आजच्या तरुणाला छत्रपती शिवराय व संभाजी महाराज सांगुन नैतिक साक्षर करणे आवश्यक आहेत. हाताला काम नसल्याने दिवसभर फक्त सोशल मिडिया आणी अश्‍लील साईट यामुळे तरुणाईला घरात आटा नसला तरी डाटा पाहिजे. आणि या डाट्या चा वापर तरूणाई संताचे विचार ऐकण्यासाठी नाही तर अश्‍लील नटीचे सिनेमे, अश्‍लील कथा, अश्‍लील विनोद बघण्यासाठी साठी. एक जिबी डाटा आज तरुणांना अपुरा पडतोय याचाच परिणाम युवकांच्या डोक्यात फक्त आणि फक्त अश्‍लील ता भयली जाते आणि यातुनच गुन्हेगाराला बळ मिळते. हे संगळं थांबवण्यासाठी मुळापर्यंत जाऊन मुळ जर तोडले तर त्याचा विस्तार नाही ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला खरचं गुन्हेगारी संपवून महिलांना सुरक्षित व सन्मानित करायचे तर बलात्काराला नेमकं जबाबदार कोण याचे उत्तर शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मुलींवर बधंने लादल्यापेक्षा मुलांवर संस्कार घालणे आवश्यक आहे. चला महापुरूष युवकांपर्यंत पोहचवून बलात्कार मुक्त भारताचा संकल्प करून महिलांना सन्मान मिळवून देऊ या.विनोद सदावर्ते
मो. 9130979300