Breaking News

शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील घटना


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
नगीना हारुण सय्यद असे या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती.
नगीना हिचे कुटुंबिय शनिवारी रात्री जेवण करण्यासाठी बसले होते. आपली मुलगी जेवण करण्यासाठी घरात नसल्याने तिच्या घरच्यांनी तिची चौकशी केली. शेजारीपाजारी गेल्याचीही खात्री तिच्या कुटुंबियांनी केली. परंतु ती आढळली नाही. यानंतर घरातल्यांनी तिला घराच्या आसपास पाहण्यास सुरुवात केली. घरापासून जवळच असलेल्या शेतात जाऊन पाहणी केली असता नगीना आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर घरच्यांनी या घटनेची माहिती श्रीगोंदे पोलिस ठाण्यामध्ये दिली. नगीनाचा मृतदेह झाडावरुन खाली उतरून घेण्यात आला. श्रीगोंदे पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलिस हवालदार झुंजार व भापकर भेट देऊन पाहणी करून तपास करत आहेत.