Breaking News

रस्तालूट करणारी टोळी जेरबंदअहमदनगर/प्रतिनिधी
 चाकूचा धाक दाखवून लूटमार करणा-या चौघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पुणे रोडवर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़. प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार केली जात असे.
 कय्युम काझी कुरेशी (वय २३ रा़ बाबा बंगाली, अहमदनगर), सद्दाम मोहम्मद अली (वय २३रा़ झेंडीगेट), मोईन बादशाह शेख (वय २० रा़ बुरुडगाव) मुसेफ नासीर शेख (वय २० रा़ मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शुक्रवारी (दि़२१) माळीवाडा बसस्थानक येथून विशाल विजय कोबरणे (गणेगाव ता़ राहुरी) याला राहुरी फॅक्टरी येथे सोडतो असे सांगून त्याला जबरदस्तीने मिरावली पहाड परिसरात घेऊन गेले़. तेथे चाकूचा धाक दाखवून आरोपींनी विशाल याचा मोबाईल कागदपत्र हिसकावून घेत त्याला सोडून दिले़. याबाबत विशाल कोबरणे याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ही लूटमार करणारे आरोपी नगर-पुणे रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास वाघ, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना कारसह ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चौघांनी विविध ठिकाणी लूटमार केल्याचे समोर आले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन कार, मोबाईल असा ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक शिरसाठ हे करत आहेत.