Breaking News

प्लास्टिक कपाने चहा ढोसणार्‍यांनो !

पर्यावरणाचा समतोल ढासळत असून त्यामुळे निसर्गचक्र निघडले आहे. जगभर प्रदुषण विरोधी सुर उमटत असून प्रदूषणाचा मानवासह संपर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला असल्याचे जगाने मान्य केले आहे. या प्रदुषणाचा एक भाग म्हणजे प्लास्टिकचा होणारा वापर. या प्रचंड प्रदूषणाचा धोका लक्षात घेवून भारत सरकारने ऐकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. ज्याला सिंगल युज प्लास्टिक असे म्हणतात. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणारे ते बाळगणारे त्याचा साठा व विक्री करणारे यांना पाच हजार रूपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आलेली आहे. या कायद्याबाबत सर्व वर्तमानपत्रांनी छापले आहे. म्हणून नागरिकांना याबाबत माहिती नाही असे म्हणता येणार नाही. तरीही दररोज, दिवसभर चहा घेण्यासाठी प्लास्टिक कपांचा वापर केला जातो.
या सिंगल युज प्लास्टिक कपात चहा पिणार्यांनी लाजा नाकाला गुंडाळून त्याचा वापर चालविला आहे, असेच म्हणावे लागेल. तर दुसरीकडे सिंगल युज प्लास्टिक वरील बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असूनही प्रशासन मात्र आंधळे होवून मुक्याचे सोंग  घेत आहे. “औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय बीड येथे जिल्हाधिकारी असतांना एका पत्रकाराने, पत्रकारांना प्लास्टिक कपात चहा दिला असे निदर्शनास आणून दिले व सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत प्रश्‍न केला असता अस्तिककुमार पाण्डेय यांनी तात्काळ स्वत:ला पाच हजार रूपये दंड ठोठावला व पुन्हा चहासाठी प्लास्टिक कपाचा वापर करणार नाही असा खुलासा केला. असा बहाद्दर अधिकारी सर्वत्र हवा. महाराष्ट्रात तर नाहीच परंतू देशातही असा खमक्या अधिकारी नसावा. त्यांनी महापालिकेतही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.’’
पर्यावरणाचे रक्षण व प्रदुषण रोखण्याचे अत्यंत लोककल्याणकारी निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. परंतू इतर कायदे- नियमांकडे जसा कानाडोळा केला जातो तसाच याही कायदे व नियमाकडे बेजबाबदार नागरिकांनी अक्षम्य कानाडोळा केलेला दिसतो आहे. याला देशाचे जबाबदार नागरीक म्हणावे काय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. सर्वच प्रकारच्या प्रदूषणापासून जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. याबाबत जगभरचे नागरिक व सरकारे हरकतीत आले आहेत. सर्वच प्रकारच्या प्रदूषणामुळे जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी ठाकलेली आहे. भारतीय नागरीकांना आणि भारतीय प्रशासनाला यांचे जराही गांभीर्य नसावे ही मोठी शरमेची बाब आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कर्मकांडी धर्म-कर्म, अंध विश्‍वास आणि काल्पनिक देवा-धर्मांच्या भ्रमात आडकलेला भारतीय समाज होय. परंतू जेव्हा प्रदूषणाच्या विनाशाचे संकट समोर येवून धडकेल तेव्हा या मागास विचारांच्या समाजाला कोणीही वाचवू शकणार नाही.
एका पाहणीतील निष्कर्षानुसार नियमीतपणे खाण्या पिण्याच्या पदार्थासाठी प्लास्टिकचा वापर करणार्या नागरिकांच्या शरिरात वर्षाकाठी 57 हजार सुक्ष्म प्लास्टिक कण शरिरात प्रवेश करतात. ज्याचे पचनक्रियेद्वारे विघटन होत नाही. ते सूक्ष्म प्लास्टिक मानवी शरिराच्या महत्त्वाच्या अवयवात रक्ताच्या माध्यमातून प्रवेश करतात. ज्यामुळे रक्ताचा कॅन्सर (ब्लड कॅन्सर) लिव्हर कॅन्सर व ब्रेन कॅन्सर होण्याचे गंभीर धोके असल्याचे वैज्ञानिक संशोधकांचे म्हणने आहे. जगातील कॅन्सर रूग्णांपैकी सर्वाधिक कॅन्सर रूग्ण भारतात असल्याच व कॅन्सर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा सरकारी अहवाल आहे. तरीही कोणीच गंभीर नाही. दिवसभरात सर्रास प्लास्टिक कपातुन चहा पितात, खाण्याचे पदार्थ प्लास्टिक मधुन बाळगतात, जेवणाच्या पार्सल प्लास्टिक मधुन घेवून जातात.
दुधाच्या पिशव्यासाठी सर्रास सिंगल युज प्लास्टिकचा वापर केला जातो. सरकार सुद्धा नुसते कायदे करून मोकळे होते. परंतू त्याच्या अंमलबजावणीचे नेहमीच चांगभले असते. याबाबत नगर पालिका, महानगर पालिका यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. परंतू मतदार नाराज होतील म्हणून कोणीही कारवाई करीत नाही. मुळात सरकारचे धोरण म्हणजे “जखम मांडली नि मलम शेंडीला’’ असेच आहे. त्या प्लास्टिकच्या निर्मिती, उत्पादनावर सरकारने बंदी घालायला हवी. ती वस्तू बाजारात उपलब्धच नसेल तर मग कोणी वापरणचा प्रश्‍नच येत नाही असे असले तरी समाज घडविण्यासाठी आवश्यकता असते. आपण सजग आहोत काय? असा प्रश्‍न प्रत्येक नागरिकाने स्वत:स विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि विचारला तरी त्याचे उत्तर नाही‘ असेच असेल. म्हणून प्रत्येक नागरिकाने याबाबत सजग होण्याची अत्यंत निकड आहे.
धार्मिक कार्यक्रम, जयंत्या, विविध मिरवणुका, लग्न वराती इत्यादी कार्यक्रमातुन मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषणाचा सुद्धा पर्यावरणाला व जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण करणार्यावर पोलिस प्रशासनाने स्वत:हून कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत. म्हणजे ध्वनी प्रदूषण होत असल्या बाबतची कोणी तक्रार करण्याची आवश्यकता नाही. असेही मा.न्यायालयाने आदेश दिलेले असतांना पोलिस नेहमीप्रमाणे तक्रारीची वाट बघतात. प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तहसीलच्या कार्यालयात ध्वनी प्रदूषणाबाबत फलक लावण्यात आलेले आहेत.
तक्रार करण्यासाठी व्हाटसऍप नंबर देण्यात आलेले आहेत व ध्वनी प्रदूषण करणार्यावर लाखो रूपयाची दंडात्मक कारवाई केली जाईल असे त्यावर नमुद करण्यात आलेले आहे. परंतू तक्रार करून कोण कोणाची दुष्मनी विकत घेईल? एवढी अक्कल फलक लावणार्या प्रशासनाला नसावी याची कीव येते. आवाजाची पातळी मोजण्यासाठी डेसिबल मशीन यंत्र ठेवण्याचेही आदेश आहेत. 55 डेसिबल पेक्षा जास्त पातळीचा आवाज असेल तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. कदाचित ही कायदेशीर बाब सामान्य नागरिकांना माहिती नसावी. परंतू डी.जे. डॉल्बी सारख्या घातक वाद्यांवर कायदेशीर बंदी आहे हे तर नक्कीच माहिती आहे. तरीही विविध कार्यक्रम मिरवणुका लग्न वरातींसाठी डि.जे.डॉल्बी आदी कर्कश वाद्यांचा नागरिकांकडून सर्रास वापर करण्यात येतो. याला काय म्हणावे? आणि शेवटचे निलाजरेपणाचे टोक म्हणजे पोलिस या गुन्हेगारीकडे सर्रास डोळेझाक करतात. अखंड हरिनाम सप्ताहाच्या कर्कश आवाजाने विद्यार्थ्याचा अभ्यास बुडतो. लहान बालकांना व वयोवृद्धांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात त्याची कोणीच महाराज तमा बाळगीत नाही.
इतकेच कशाला मा.सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वा. पर्यंत आवाज बंदी केलेली आहे. धर्मांध लोक सर्रास याचे उल्लंघन करतात कोणीही कोणाला काहीही बोलत नाही, नि कारवाईही होत नाही म्हणून काळ सोकावला आहे. सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, धार्मिक स्थळ, रूग्णालय यांच्या शंभर मिटरपर्यंत हॉर्न वाजविण्यास, वाद्य वाजविण्यास कायद्याने बंदी आहे. कोण सजग नागरिक या सर्व कायद्याचे पालन करतो व कोण कर्तव्यदक्ष प्रशासन पोलिस त्या विरूद्ध कारवाई करतो? का आपण फारच शहाणे आहोत का? म्हणून आपण सर्वच जणांनी नुसत्या सिंगल युज प्लास्टिक कपात चहा घेवून प्रदूषण करण्याचा निलाजरेपणा केलेली नाही; तर सर्वच प्रकारचे प्रदूषणे करून आपण आपल्या ...नाकाला गुंडाळल्या आहेत.- शेखर कुमार
बीड, मो.9822535796