Breaking News

गाव तेथे ग्रंथालय आवश्यक संजय बेंडे यांचे प्रतिपादन


पारनेर/ प्रतिनिधी ः
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात दिसते. परंतु त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. हे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजासहजी उपलब्ध नसल्यामुळे ते विद्यार्थी स्पर्धेच्या काळात मागे राहताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी गाव तेथे ग्रंथालय होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संजय बेंडे यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेंडे यांनी करिअरच्या नव्या दिशा विषयावर व्याख्यान दिले.
  बेंडे म्हणाले, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सूत्राद्वारे विद्यार्थ्यांनी करिअर निवडायला हवे. शिक्षण घेत असताना चांगला माणूस बनण्याबरोबरच आपण घेतलेले शिक्षण व्यावहारिक दृष्ट्याही कसे उपयोगी पडेल याचाही विचार व्हावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास कमी असलेला दिसून येतो. याचे कारण त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य, संभाषण कौशल्याची कमतरता  दिसून येते. ती कौशल्ये विकसित होणेही तितकेच आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी स्वतःला झोकून देऊन अभ्यास करावा, अहोरात्र कष्ट घ्यावे, वर्तमानपत्र, नियतकालिक अशा सर्व माध्यमांचा उपयोग करावा, असेेही ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विविध व्याख्यानांचे, कार्यशाळांचे आयोजन नेहमी केले जाते. याचे कारण आजचा विद्यार्थी हा स्पर्धेच्या काळात चांगल्या क्षमतेने परीक्षेला सामोरा जायला हवा. त्याला चांगले यश प्राप्त व्हावे हा उद्देश या विविध उपक्रमांमागे असतो.     
       उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविधांगी प्रकारचे वाचन करून परीक्षांना सामोरे जायला हवे. त्यातून यश लवकर प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संयोजन संदीप ठोंबरे, अनिल शिंदे, नवनाथ चेडे यांनी केले. प्रास्ताविक प्रवीण डौले यांनी केले. आभार प्रांजली भराटे यांनी मानले.