Breaking News

संघावर बंदी घातल्यानंतरच मनुवाद संपेल : चंद्रशेखर आझाद


नागपूर : जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लावली जाईल, तेव्हाच या देशात मनुवाद संपेल. त्यामुळे संघावर बंदी लावलीच पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केली आहे. ते नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. भाजप संघ चालववत असून संघप्रमुख मोहन भागवत यांनी भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याऐवजी स्वत: निवडणुकीच्या मैदनात उतरावे, असे आव्हानही आझाद यांनी केले.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रेशीमबाग मैदानावर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर पार पडलेल्या या सभेतच त्यांनी संघावर टीका केली. संघात हिम्मत असेल तर त्यांनी समोर येऊन मनुस्मृतीच्या मुद्दावर निवडणूक लढवून दाखवावी.एनपीआरला राज्य सरकार थांबवू शकते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात एनपीआर थांबवावे, जर महाराष्ट्र सरकारने तसे केले नाही तर आम्हाला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल, मोर्चे काढावे लागतील, असा इशाराही त्यानी दिला. सीएए आणि एनआरसी हे कायदे एका मोठ्या कटाचा भाग असल्याची टीका त्यांनी केली. सीएए विरोधात संघर्ष करत राहू, कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, असेही आझाद म्हणाले. मुस्लिमांनी तीन तलाक, कलम 370 आणि बाबरी मशिदीसाठीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही. मात्र, जेव्हा नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून राज्य घटनेवर संकट आले तेव्हा मुस्लिम बाहेर निघाले आणि आंदोलन सुरू केले, असे ते म्हणाले. आरक्षणाला विरोध करण्याऐवजी संघ प्रमुखांनी आरक्षणच्या मुद्द्यावर माझ्याशी उघड चर्चा करावी असे आव्हानही आझाद यांनी दिले आहे. सभेच्या अखेरीस आझाद यांनी संपूर्ण देशाला मुस्लिमांचे आभार मानण्याचे आग्रह केला. न्यायालयाने भीम आर्मीला 3 तासांसाठी मेळाव्याची परवानगी दिली होती. मात्र, चंद्रशेखर आझाद अखेरच्या एका तासासाठीच मेळाव्यात आले. या मेळाव्यात दलित तरुणांच्या तुलनेत मुस्लिम तरुण जास्त संख्येत उपस्थित होते.