Breaking News

संवेदनाहीन नेत्यांचे राजकारण मुडदेही कुरतडणार का?धर्मनिरपेक्ष भारताची वाटचाल कट्टरपंथाकडे होऊ लागली नव्हे ,अर्ध्याहून अधिक प्रवास संपला आहे.स्वातंञपुर्व आणि स्वातंञ्योत्तर भारत धर्मनिरपेक्ष म्हणून जगात ओळखला जातो.स्वातंञ्यानंतर स्वीकारलेली लोकशाही या धर्मनिरपेक्षतेला बळ देईल ही अपेक्षा माञ फोल ठरतांना दिसते आहे.या परिस्थितीला कुणी एक राजकीय विचारधारा कारणीभूत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरणार असले तरी मुख्य जबाबदारी माञ काँग्रेस आणि मुळ जनसंघ आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर ठेवणे अपरिहार्य आहे.या दोन्ही जबाबदार राजकीय पक्षांचा खांदा धर्मनिरपेक्ष निकोप समाज ऐक्याच्या खुनाने माखला आहे.हे तितक्याच जबाबदारी म्हणता येईल.


भारतात धर्मनिरपेक्ष  वादाच्या खुनाची प्रक्रीया सन १८५७ नंतरच्या पहिल्या उठावानंतर तत्कालीन ब्रिटीश सत्तेने सुरू केली  या तथ्याला ऐतिहासिक  दाखला आहे.मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली सन १८५७ ला पहिला स्वातंञ्याचा उठाव झाला.या उठावात हिंदू मुस्लीम समाजाचा सहभाग ब्रिटीश राजवटीला खटकल्यानंतर हिंदू मुस्लीम समाजात मतभेदांची भिंत उभी केल्याशिवाय अखंड भारतवर्षावर सत्तेचे साम्राज्य लादता येणार नाही याची जाणीव ब्रिटीशांना झाली आणि फोडा झोडा आणि राज्य करा हे धोरण त्यांनी स्वीकारले आणि दिडशे वर्ष राज्य करून जाताजाता या भारत वर्षाला हे धोरण देणगीदाखल देऊन गेले.पाकीस्तानची निर्मीती हे या ब्रिटीशांच्या त्या धोरणाचे अनौरस अपत्य आहे.इंग्रजांनी हिंदू मुस्लीम समाजात निर्माण केलेली दरी स्वातंञ्यानंतराही कायम राहीली.किंहूना इंग्राजळलेल्या भारताच्या राजकीय मानसिकतेने ब्रिटीशांच्याच फोडा झोडाच्या राजनितीचा अवलंब करून सत्तेच्या सोपानाला वरले.

स्वतंञ भारतात झालेल्या प्रत्येक  निवडणूकीत  मतांची बेरीज करण्यासाठी जातपात धर्माच्या ऐक्याची वजाबाकी करण्याचे पाप राजकारण्यांनी केले.वरकरणी भारताने धर्मनिरपेक्षवाद स्वीकारला असला तरी निवडणूकीच्या राजकारणात तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांकांचा अनुनय करून मतांचे ध्रूवीकरण केले.असा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांनी वारंवार केल्याने भारतात बहुसंख्य असलेल्या पण राजकारणाच्या विविध गटांमध्ये विभागलेल्या समाजात भिती निर्माण होऊ लागली.स्वतःला असुरक्षित समजू लागलेला हा समाज अल्पसंख्यांकांच्या  संघटनाला शह देण्याच्या हेतूने एकवटू लागला.या एकवटण्याला काँग्रेस विरोधकांनी राजकीय स्वार्थातून   निर्माण केलेले असुरक्षित वातावरण निमित्त ठरले.त्याचा फायदा कट्टर धर्मपंथियांनी अलगद उचलण्यास सुरूवात केली.अर्थातच या कट्टर पंथियांच्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्याचे काम सनातनी मार्गावर चालणारे धर्मांध,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि याच मुशीत तयार झालेल्या जनसंघाने दिले.इथपर्यंतच्या धर्मनिरपेक्षकतेच्या प्रवासाला निर्माण झालेल्या धोक्याच्या कारणमिमांसेबाबत जवळपास सर्वच समाज तज्ञांची सहमती मिळण्यास हरकत नसावी.

धर्मांधतेचे विष हळूहळू शह काटशहातून दोन्ही समाजात भिनत केले आणि पुर्वी नेत्याला मिळणारी राष्ट्रीय मान्यता एका विशिष्ट धर्माच्या जातीच्या चौकटीत अडकली.आणि इथेच धर्मनिरपेक्षतेचा पहिला पराभव झाला.ऐंशीच्या दशकानंतर जात पंथ धर्म यातच भारतीय राजकारण अडकून पडले.किंबहूना निवडणूकीच्या विजयाचा अजेंडाच या निकषावर ठरविला जाऊ लागला.भारताचे धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारीत राजकारण आणि त्यापाठोपाठ समाजकारणही प्रदुषीत झाले.धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेली ही परिस्थिती दोन्ही समाजात आणखी असुरक्षितता निर्माण करू लागली.जातीय धार्मिक दंगलीचा वणवा देशभर कुठे ना कुठे धुमसत होताच.देशात कुठेही धार्मिक दंगल झाली की त्याचे लोण देशभर पसरत होते.अपवाद होते फक्त राजधानीचे शहर.१९८४ चा अपवाद वगळता दिल्ली या देशाच्या राजधानीत धर्म सलोखा कधी डळमळीत झाल्याचे ऐकीवात नाही.
सन २०२० मध्ये माञ दिल्लीच्या सामाजिक सलोख्याने ही परंपरा मोडीत काढली.अर्थात परंपरा मोडीत काढण्याचे पाप सामाजिक सलोख्यावरा फोडणे दखलसाठी मोठा प्रमाद ठरेल.दिल्लीचा सामाजिक  सालोखा ढळला नाही तर षडयंञाने ढासळवण्याचे पाप राजकारणाने केले असे म्हणण्यास परिस्थितीजन्य पुरावा आहे.
दिल्लीकरांना सारं काही मोफत पाहीजे ना,मग घ्या..अशा प्रकारचे मेसेज सोशल मिडीयावर आता व्हायरल होऊ लागले आहेत,या मेसेज मधून दिला जाणारा संदेश दिल्लीकरांना आगीत कुणी आणि का ढकलले याची प्रचिती देतो.दिल्लीला विधानसभा निवडणूकीचे वेध लागले तेंव्हाच या षडयंञाची बीजे पेरण्यास सुरूवात झाली होती.त्यात एनआरसी ,एनपीआर आणि सीएए यासारख्या मुद्यांनी या षडयंञाला आयते कोलीत दिले.केंद्रात सत्तेवर असलेला भाजपा आणि दिल्ली राज्यात सत्ता असलेले आम आदमीमध्ये असलेल्या राजकीय संघर्षाला धर्माचे व्यासपीठ बनविण्याचा शकूनी प्रयत्न होऊ लागला.तपशीलात जाण्याचे कारण नाही.शाहीनबागवरून झालेला तत्कालीन प्रचार ,दिल्लीच्या मुख्यमंञ्यांनी  म्हटलेली हनुमान चालीसा ,भाजपाच्या वाचाळवीरांनी केलेली भडकावू वक्तव्ये या तपशीलासाठी पुरेसे आहेत.एकूणच धर्मांध शक्तींनी जंगजंग पछाडूनही दिल्लीकरांनी दाद दिली नाही.
विधानसभा निवडणूकीत झालेला दारूण पराभव जिव्हारी लागल्याने समर्थकांनी गेल्या चारपाच महिन्यांत निर्माण केलेल्या वातावरणाला हावा देण्याचा कुटील प्रयत्न केला.कपील मिश्रा,वारीस पठाण यांच्यासारख्या खऱ्या समाजशञूंनी आपला डाव टाकला.त्याचे परिणाम दिल्ली भोगत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात असतांना राजधानी धुमसतेय आणि दिल्ली पोलीस मजा पाहतात.यातच या षडयंञाचे औचित्य लक्षात येते.उच्च न्यायालयानेही दिल्ली पोलीसांना मारलेले शाल जोडे यापेक्षा वेगळे सांगत नाहीत.याचाच अर्थ राजकारणात वावरणारे संवेदनाहीन नेते आता मुडदेही कुरतडून आपले राजकारण करू लागले असल्याचे भयान वास्तव देशासमोर उभे ठाकले आहे.