Breaking News

वेदना सहन करत जगणार्‍या नवनाथच्या पायावर शस्त्रक्रिया सावली दिव्यांग संस्थेचा पुढाकार


शेवगाव/ प्रतिनिधी ः
निकामी ठरलेल्या पायांसह जीवन कंठणार्‍या ऊसतोड मजुरांच्या मुलाच्या एका पायावर सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या पुढाकारातून अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली.
तालुक्यातील हातगाव येथील उसतोड कामगार असलेल्या एकनाथ आंबेकर यांचा नवनाथ हा मुलगा. तो सहा महिन्यांचा असताना त्याच्या पाठीत गोळा झाला. हा गोळा खासगी दवाखान्यात काढण्यात आला. परंतु दुर्दैवाने त्याचा परिणाम नवनाथच्या पायावर झाला. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. त्या पायावर जखमा झाल्या. त्यावर कोणताही उपचार होत नव्हता. नवनाथ 17 वर्षांपासून या जखमांच्या वेदना सहन करत जगत होता.
  अनेकांनी त्याच्या घरच्यांना यावर काही उपचार नाहीत. याला राजस्थानला न्यावे लागेल, असा सल्ला दिला. नवनाथ आणि त्याच्या घरचे यामुळे हतबल झाले होते. परंतु प्रसारमाध्यमांमुळे हा विषय प्रकाशात आला आणि त्याची दखल दिव्यांगांसाठी काम करत असलेल्या सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेने घेतली. नवनाथला दिव्यांग प्रमाणपत्रासह दिव्यांगांसाठीची सायकल देण्यात आली. यानंतर या संस्थेने त्याच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले. त्याला उपचारासाठी नगर येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. नवनाथच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या. त्याच्या पायावर शस्त्रक्रियेस डॉक्टरांनी अनुकूलता दर्शवली. अखेर 22 फेबु्रवारी रोजी त्याच्या एका पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नवनाथला पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याची आशा निर्माण झाल्याने त्याच्या आई-वडिलांसह बाबासाहेब महापुरे, चाँद शेख, बाहुबली वायकर, गणेश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. नवनाथचे पुनर्वसन करण्यासाठी सावली संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनीही आपापल्या परीने योगदान दिले आहे.