Breaking News

सी. ए. ए, एन. आर. सी. संदर्भात महापालिकेत ठराव करा नगरसेवक आसिफ सुलतान यांची मागणी


अहमदनगर / प्रतिनिधी
भारतीय संविधानाच्या कलम १४,१५ आणि २९ चे उल्लंघन करणाऱ्या सुधारित नागरिकत्व कायदा सी. ए. ए, एन. आर.  सी., एन. पी. आर. कलम रद्द करण्यासाठी महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभेत विषय घेऊन हा कायदा रद्द करण्यासाठी ठराव करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नगरसेवक आसिफ सुलतान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, देशातील ४० टक्के सामान्य नागरिकांचे नागरिकत्व धोक्यात आलेले आहे. साक्षरतेचे प्रमाण पाहता कोट्यवधी नागरिक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरणार आहेत. यामुळे देशात शांतता व भितीयुक्त वातावरण पसरले आहे. नागरिकत्व हिरावले जाणार असून आपल्याकडे मालमत्तेची महसुली पुरावे नाहीत. आई वडिलांचे, आजी-आजोबांचे जन्म पुरावे हे जन्म नोंदणी कायदा पूर्वीचे जर असतील ते पुरावे कसे व कुठून सादर केले जातील, या भीतीने सामान्य नागरिक धास्तावलेला आहे. देशभराच्या नागरिकांमध्ये रोष आहे. लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. अबालवृद्ध महिला एन आर सी, सी. ए. ए. , एन.  पी.  आर. चा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नवीदिल्ली येथे शाहिनबागमध्ये हजारोंच्या संख्येने महिला दोन महिन्यापासून २४ तास आंदोलन करीत आहेत. दरम्यान, या मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले आहे.