Breaking News

शहर नव्हे 'फ्लेक्स'च्या जाहिरातींचे गाव! उत्पन्न मात्र कोणास नाय ठाव!

balasaheb shete / mo. 7028351747
एखाद्या शहराचे विद्रुपीकरण किती होते, यावरून त्या शहराची संस्कृती आणि परिचय कळतो. अहमदनगर या ऐतिहासिक शहराचेदेखील असेच काहीसे झाले आहे. कोणीही लुंग्याने सुंग्याने उठावं आणि भले मोठे फ्लेक्स लावून चार चौघांत फुशारकी मारावी, असा प्रकार या शहराला आता नवीन राहिलेला नाही. दिल्लीगेट असो नाही तर माळीवाडा वेस असो. कोठेही या फ्लेक्सचा प्रचंड भडिमार असतो. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांनी या शहराचे वैभव पाहण्याऐवजी नुसते फ्लेक्स पाहून समाधान मानावं, एवढेच तर या फ्लेक्सबहाद्दरांना वाटत तर नसावं ना, अशीही शंका स्थानिक नागरिकांमधून  व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यातून महापालिकेला दरमहा किंवा वर्षाला किती महसूल मिळतो, याची माहिती दस्तुरखुद्द मनपाच्या कार्यालयातल्या कोणालाच देता येत नाही. ज्या मार्केट विभागाकडे ही जबाबदारी आहे, त्या विभागाला साधा 'लँडलाईन' फोनदेखील नसावा, हे म्हणजे 'अती' झाले, असेच म्हणावे लागेल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने फ्लेक्सच्या जाहिरातींसंदर्भात योग्य त्या मार्गदर्शक सूचना मनपाला दिलेल्या आहेत. न्यायालयाच्या त्या सूचना आणि आदेशांचे उल्लंघन मनपा हद्दीत सर्रास होते, हे सांगायला कोणा ज्योतिषाची अजिबात गरज पडणार नाही. माळीवाडा वेशीपासूनदिल्लीगेट वेशीपर्यंत सगळीकडे फ्लेक्सच्या जाहिरातींचा इतका धुमाकूळ आहे, की या शहरात पुरातन वस्तू फक्त फेक्सच्या जाहिराती टांगायपुरत्याच आहेत की काय, असा विचार या शहरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या मनात येतो. हे शहर ऐतिहासिक आणि पौराणिक आहे. या शहरात असलेल्या अमृतेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अधूनमधून महादेवाच्या दर्शनाला यायचे. मात्र हा इतिहास किती जणांना माहित आहे, हा तसा संशोधनाचा विषय होईल. परंतु या शहरात सध्या या आणि अशा अन्य ऐतिहासिक माहितीचे केवळ फ्लेक्समुळे कोणालाच महत्व नाही, हे वास्तव आहे. माळीवाडा, टिळकरोड, आयुर्वेद कॉर्नर, नालेगाव, अमरधाम, दिल्लीगेट, नीलक्रांती चौक, सिद्धार्थनगर, अप्पू हत्ती चौक, लालटाकी, पत्रकार चौक, भूतकरवाडी, सावेडी, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, वाणी नगर, एकविरा चौक, श्रीराम चौक, अलीकडे सर्जेपूरा, कोठला, झेंडीगेट, मार्केटयार्ड, इंपिरियल चौक, बुरूडगाव रोड आदी भागांत कुठेही नजर टाकली, की सर्वात पहिल्यांदा फ्लेक्सच्या जाहिराती दिसतात. बरं या जाहिराती कशाच्या आहेत, त्यातून नक्की काय संदेश द्यायचा आणि त्याचा या ऐतिहासिक अहमदनगर शहरात वास्तव्य करणाऱ्या भोळ्या जनतेला काय फायदा, याचा काडीमात्र विचार या फ्लेक्स बहाद्दरांच्या मनाला साधा शिवतदेखील नाही. आता यावर आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच गांभिर्याने विचार करून या फ्लेक्स बहाद्दरांकडून रगड दंड वसूल करावा आणि मनपाच्या तिजोरीला हातभार लावावा, अशी माफक अपेक्षा या शहरातील भोळी जनता व्यक्त करत आहे.