Breaking News

महापौर साहेब! संताप व्यक्त करण्याऐवजी असल्या मुजोर अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा!


balasaheb shete / mo. 7028351747 
खासगी दवाखाने, खासगी रक्तपेढ्या सामान्यांच्या बोकांडी बसलेल्या असताना मनपाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रक्तपेढीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढते आहे. मनपाच्या रक्तपेढीचे अधिकारी डॉ. शंकर शेडाळे यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. महापौरांनी संपूर्ण रक्तपेढीची पाहणी करत बंद असलेल्या मशिनरीबद्दल अधिकाऱ्यांऐवजी नाविलाजास्तव कर्मचार्‍यांना जाब विचारला. मात्र अधिकारीच तुमचा फोन घेत नसतील तर कर्मचारी तरी काय करणार? त्यामुळे अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सरळ सरळ हकालपट्टी करावी आणि नवीन होतकरू तरुणांना संधी द्यावी. मात्र यासाठी महापौरांकडे तसे धाडस असायला हवे.
महापालिकेची रक्तपेढी सुरु करण्याबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत महापौरांनी सूचना दिली होती. मात्र तरीही या कर्मचार्‍यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे महापौरांनी उपस्थित कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरुन जाब विचारला. यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीच्या दुरावस्थेसाठी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी महापौरांकडे केली. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमधील महानगरपालिकेच्या रक्तपेढीचा कारभार पूर्ववत होऊन या ठिकाणाहून रक्त सुविधा मिळाव्यात, अशी सामान्य नागरकरांची रास्त मागणी आहे. यासाठी ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिकेत अधिकारी व भाजपाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन अधिकार्‍यांना तातडीने रक्तपेढी पुर्ववत सुरु करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र अद्याप रक्तपेढीचे काम सुरळीत झाले नाही. त्यामुळे महापौर वाकळे यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह अचानक रक्तपेढीला भेट देऊन सद्य परिस्थितीची पाहणी केली. महापौर वाकळे यांनी रक्तपेढीचा कारभार पाहून संताप व्यक्त केला. नियुक्त असलेले कायम कर्मचारीदेखील याठिकाणी गैरहजर होते. तसेच कंत्राटी कामगारही उपस्थित नव्हते, त्यामुळे महापौरांनी हजेरी पत्रक पाहिले असता, दि.१४ फेब्रुवारीपासून कर्मचार्‍यांनी रजिस्टरवर सह्याही केलेल्या नाहीत. त्यामुळे महापौर वाकळे यांनी स्वत: सर्व कर्मचार्‍यांची गैरहजरी नोंदविली.
महापालिकेच्या रक्तपेढीसह अन्य विभागांसंसदर्भातही नागरिकांच्या गंभीर तक्रारी आहेत. आरोग्य, बांधकाम, शिक्षण आदी विभागांत मोठी अनागोंदी आहे. मनपाचा वसुली विभाग तर काय नुसत्याच झोपा काढतो की काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. याचे कारण मनपाच्या अंदाजपत्रकाहून थोडी कमी म्हणजे तब्बल अडीचशे कोटी रुपये मनपाचे थकले आहेत. मनपाची वसुली शंभर टक्के झाली तर मनपाला या ऐतिहासिक अहमदनगर शहरात विकासकामे करायला खूप हातभार लागेल. मात्र मनपाच्या वसुली विभागाचे कर्मचारी काय करतात, हा मोठा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. याकडे महापौर वाकळे आणि अन्य सदस्यांनी बारकाईने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.