Breaking News

नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेची राजकीय कोंडी

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाला लोकांचा असलेला विरोध पाहून शिवसेनेनेही टोकाचा विरोध केला. आता प्रकल्प हवाय, असे समर्थन वाढत असताना मात्र शिवसेना प्रकल्प नको या भूमिकेवर कायम आहे. त्यातून उदभवलेल्या वादातून शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. आता तरी शिवसेनेने शहाणे होण्याची गरज आहे.
नाणार प्रकल्पावरुन सध्या राजापूर तालुक्यात घमासान सुरू आहे. आतापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाची भूमिका म्हणून प्रकल्पविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी होत होते. मात्र प्रकल्पाला विरोधकांच्या एका नेत्याने या क्षेत्रातील जागा गुजरातच्या एका उद्योजकाला व्यवसासाठी विकण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे जागा द्यायचीच असेल तर रिफायनरी प्रकल्पाला देऊ अशी भूमिका घेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी प्रकल्पाला समर्थन देऊ लागले. शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रकल्प समर्थकांनी अधिक उत्साहाने प्रकल्पाची मागणी पुढे रेटली. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि प्रकल्प समर्थकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी होती. मात्र शिवसेनेच्या एकूणच ताठर भूमिकेमुळे खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यात कोणीच स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे या समर्थकांनी अखेर प्रकल्पाच्या मागणीचे फलक मुख्यमंत्र्यांना दाखवले. या प्रकारामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांना पदावरुन काढून टाकण्यात आले. या कारवाईमुळे 22 शाखाप्रमुख आणि एका विभाग प्रमुखाने आपल्या पदांचे राजीनामे दिले. हे राजीनामे स्वीकारण्याआधीच शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सागवे विभागाची कार्यकारिणीच बरखास्त केली. पाठोपाठ सागवे जिल्हा परिषद गटाच्या सदस्य मंदा शिवलकर यांच्याकडेही शिवसेनेने राजीनामा मागितला आहे. या सर्व घडामोडी हा शिवसेनेचा आततायीपणा ठरण्याची शक्यता अधिक आहे. प्रकल्पाला ठराविक लोकांचा विरोध आहे. स्वतःला पर्यावरणवादी आणि सामाजिक समजणार्‍या काही संस्थांनी हा विरोध मोठा असल्याचे चित्र निर्माण केले आहे. त्याला शिवसेना फसली आहे. आम्ही लोकांच्या बाजूने आहोत असे म्हणणारी शिवसेना आता प्रकल्प समर्थकांचे म्हणणेही ऐकून घ्यायला तयार नाही. 70 टक्के प्रकल्पग्रस्तांनी जमीन देण्यासाठी संमती दिलेली असतानाही शिवसेना अजून प्रकल्पाला विरोधच करत आहे. खरं तर राजकीय पक्षांनी समाजाला दिशा देणे, समाजाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. पण शिवसेना असे नेतृत्व करण्याऐवजी लोकांच्या मागून जात आहे. आपल्या समाजासाठी नेमके काय योग्य आहे, याचा विचार करुन राजकीय पक्षांनी त्यात पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना मात्र लोकांना हवं ते असं म्हणून उलट्या दिशेने प्रवास करत आहे. कारण शिवसेना फक्त भावनिक दृष्टी ठेवूनच पुढे जात आहे. भावनेइतकेच महत्त्व व्यवहारालाही देणे गरजेचे आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हेच नाही तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. शिवसेनेला या गोष्टी दिसत नाही किंवा पाहायच्या नाहीत किंवा त्या समजूनही घ्यायच्या नाहीत. प्रकल्प नाकारुन कोकणाचे भाले होणार नाही, हे शिवसेनेच्या गळी अजून उतरलेले नाही. शिवसेनेला याचेच शहाणपण येणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनही जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. पण त्याला मर्यादा आहेत. गोव्यासारखे धोरण महाराष्ट्रात/कोकणात राबवले जाणार नाही, राबवता येणार नाही. त्यामुळे त्यातून विकासाला मर्यादा आहेत. आताचे नवीन तंत्रज्ञान प्रदूषणाला आळा घालणारे आहे. त्यातही राज्य सरकार नियम, अटी घालून प्रकल्पाला परवानगी देऊ शकते. पण शिवसेनेने पोटदुखीचे सोंगच घेतले असल्याने ती बरी होणे अवघड आहे.