Breaking News

टाकळीभानमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार यापूर्वीही कालवडी, कुत्र्यांवरही हल्ला


टाकळीभान/प्रतिनिधी ः
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. कोबरणे वस्ती येथे गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
टाकळीभान-घोगरगाव रस्त्यालगत गावाजवळच गट नंबर 461 मध्ये राजेंद्र सोन्याबापू कोबरणे यांची वस्ती आहे. गुरुवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास बिबट्याने वस्तीत प्रवेश केला. कोबरणे यांच्या घरासमोरच लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात एक शेळीला बिबट्याने जागेवरच ठार केले तर दुसरीला उसाच्या फडात फरफटत नेले. गुरुवारी सकाळी हा प्रकार कोबरणे कुटुंबियांच्या लक्षात आला. या परिसरात यापूर्वीही बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेळ्या, बोकड, कालवडी, कुत्र्यांवर हल्ला केला आहे. आधीच या भागात बिबट्याच्या संचाराने शेतकर्‍यांमध्ये भीती आहे. गुरुवारी रात्रीच्या प्रकाराने शेतकर्‍यांनी आता बिबट्याचा चांगलाच धसका घेतला आहे. वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी कोबरणे व  परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.