Breaking News

जामखेड शहरात एक जणावर गोळीबार


जामखेड/ प्रतिनिधी ः 
शहरातील बीड रस्त्यावर शनिवारी दुपारी एक जणावर गोळीबार करण्यात आला. ग्राहक सेवा केंद्रातून पैसे निघण्यात अडचणी आल्याच्या वादातून हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी बाळू दादा डोके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी बाजारासाठी जामखेडला आलो होतो. तेथे विकास थोरात व विशाल मगर बुलेटवरून आमच्याजवळ आले. यावेळी त्याने आम्हा तिघा भावांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. तुम्ही माझ्या नादी लागतात काय, असे म्हणून विकास थोरात याने शिवीगाळ केली. यावेळी त्याने मारहाणही केली. आज तुझा काटाच काढतो, असे म्हणत त्याने आरडाओरडा केला. विकास याने कमरेला लावलेले पिस्तूल काढले आणि माझ्यावर रोखून गोळीबार केला. परंतु सावध होऊन त्याचा हात वरच्या दिशेने रोखल्याने ही गोळी हवेत उडाली, असे डोके यांनी नमूद केले आहे.
आपल्या अपंग भावाचे जामखेड येथे स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. तेथे विकास थोरात याच्या सासू पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. परंतु इंटरनेटच्या अडचणीमुळे पैसे निघाले नाही. तेव्हा आपला भाऊ व विकास याचा वाद झाला होता, त्या रागातून विकास याने हा गोळीबार केल्याचेही बाळू डोके यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या फिर्यादीवरुन विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर (दोघे राहणार सावरगाव, ता. जामखेड) यांच्याविरुद्ध जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व नीरज बोकील यांचे प्रत्येकी एक पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट दिली.
जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी याच बीड रोडवरील मार्केट यार्डसमोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत असल्याने कायदा -सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.