Breaking News

त्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी रेणुका कोल्हे यांची मागणी


कोपरगाव/ तालुका प्रतिनिधी ः 
हिंगणघाट येथे युवतीला पेट्रोल टाकून जाळणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी कोपरगाव स्वयंसहायता महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे यांनी केली.
         येथील संजीवन युवा प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना हिंगणघाट प्रकरणी स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
         प्रारंभी येवला रोड संजीवनी मशालस्थळी निर्भयाला आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिल्पा रोहमारे, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, श्‍वेतांबरी राऊत, हर्षदा कांबळे, विजय वाजे, सुनील देवकर, अविनाश पाठक, स्वप्नील निखाडे, गोयल, सिद्धार्थ साठे, रोहित कणगरे, वासू शिंदे, अनुप शिंदे, रामदास गायकवाड, मयूर रुईकर, दिनेश गाडेकर, सिद्धार्थ पाटणकर, अतुल सुरळकर आदी उपस्थित होते.
         कोल्हे म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना मानवतेला काळीमा फासणार्‍या आहेत. स्त्री शिक्षणातून सबला होत आहे परंतु समाजात अजूनही काही नराधम वृत्तीची माणसे आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. हिंगणघाट घटनेतील संबंधिताला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सिद्धार्थ साठे यांनी आभार मानले.